अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण असताना दोन वर्षांपूर्वी जीवघेण्या ठरलेल्या कोरोनानेही प्रादुर्भाव आटोपता घेत भक्तांच्या उत्साहाला जणू पाठिंबाच दर्शविला आहे. गेल्या महिनाभरापूर्वी केरळपाठोपाठ महाराष्ट्रात थैमान घालणारा कोरोनाचा ‘जेएन-१’ हा नवा व्हेरिएंट नाशिकमध्ये तूर्ततरी प्रभावहीन ठरला आहे. गेल्या महिनाभरात आढळलेले कोरोनाचे २५ पैकी २३ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून, केवळ दोन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. या दोन्ही रुग्णांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम सिन्नर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाला रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करत राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपायययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नाशिक शहरातही एकाच दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. पाठोपाठ अंबड परिसरातही दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल असा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तविला होता. त्यामुळे संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज झाला होता; परंतु, यापूर्वीच्या साथीमुळे नागरिकांमध्ये अॅण्टिबाॅडीज तयार झाल्यामुळे नाशिकमध्ये कोरोनाचा सक्रिय प्रसार झाला नसल्याचे चित्र आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशा उत्सव कालावधीत कोरोना प्रभावहीन ठरल्यामुळे भक्तांचा उत्साह दि्वगुणित झाला आहे.
मनपाकडून ३,३०२ चाचण्या
नाशिक शहरात गेल्या महिनाभरात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांपैकी ३,३०२ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३,१३६ जणांच्या ॲण्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. यात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तर १३७ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यात १९ जण पॉझिटिव्ह आढळले. अशा प्रकारे नाशिक शहरात आतापर्यंत २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्याला लागण
शहरात गेल्या महिनाभरात २५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यापैकी २३ जण उपचाराअंती पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात दोन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी एक रुग्ण महापालिकेच्याच वैद्यकीय विभागातील कर्मचारी आहे. हा रुग्ण वडाळा गाव परिसरातील रहिवासी आहे. तर दुसरा पंचवटीतील नागरिक आहे. या दोन्ही रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
—
अशी आहेत लक्षणे…
सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे. अशा संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेची रुग्णालये तसेच शहरी आरोग्यसेवा केंद्रांमध्ये संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत.
अशी आहे सज्जता :
एकूण बेड उपलब्धता- ७,३५३
आयसीयू बेड- ५३३
पीपीई किट- ५,००००
ॲण्टिजेन किट- १,७८,०००
आरटीपीसीआर किट- १,०००
एन -९५ मास्क – १,०००
व्हेटिंलेटर- १६५
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर- १,८२०
जम्बो सिलिंडर- ३,०००
नागरिकांमध्ये ॲण्टिबॉडीजचे प्रमाण चांगले असल्यामुळे शहरात कोरोनाचीही रुग्णसंख्या ही नियंत्रणात आहे. तरीही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतराचे पालन करावे. – डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
हेही वाचा:
- नायलॉन मांजाचा सुळसुळाट : घातक मांजाच्या विक्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
- साष्-टांग नमस्कार : येवा, अयोध्या तुमचीच आसा!
- Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला
The post पुढारी विशेष I नाशकात कोरोनाचा नवा व्हेरिएंट प्रभावहीन appeared first on पुढारी.