भगरे सरांच्या विजयाचा येवल्यात जल्लोष

येवला : पुढारी वृत्तसेवा– दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय साकारताच येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांच्या येवल्यातील यशस्वी सभेचे शिल्पकार माणिकराव शिंदे व शाहूराजे शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी झालेल्या आनंदोत्सवात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर विंचूर चौफुली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत एकमेकास पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली.

भगरे सरांशी नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करून त्याला तुतारीसारखेच पिपाणी निवडणूक चिन्ह घेण्याची कूटनीतीसुद्धा भाजपला वाचवू शकली नाही, असा टोला लगावत माणिकराव शिंदे यांनी ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती. भगरे सरांसारख्या सर्वसामान्य व्यक्तीस उमेदवारी देण्याची रणनीती सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाली, असे मत नोंदवले.

राज्यातच नव्हे तर देशात शरद पवारांना जोड नाही, देशाचे राजकारण बदलवण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे. येत्या विधानसभेत महाविकास आघाडी मोठ्या दमाने रणांगणात उतरणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी डॉ. संकेत शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे, ज्येष्ठ नेते विठ्ठल शेलार, अकबर शाह, अकील शेख, निसार लिंबूवाले, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय कासार, अक्षय तांदळे, राजू कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.