
चांदवड :(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले व काहींना उमेदवारी मिळून देखील विजयी होता न आल्याने नाराज झालेल्या भाजपच्या काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात (शिंदे गट) जाहीर प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे.
हा प्रवेश आज बुधवार (दि.२४) रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई येथील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
राजकीय पुढाऱ्यांच्या मागे- पुढे केल्यावर आपल्याला राजकारणात योग्य जागा मिळेल या आशेने प्रत्येक राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करीत असतो. मात्र ज्यावेळी निवडणुका येतात. त्यावेळी आपल्याला न्याय मिळेल अशी माफक अपेक्षा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची असते. याची प्रचीती नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतून जाहीरपणे समोर आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण नाराज झाले होते. तर काहींना उमेदवारी मिळूनही पराभव पत्करावा लागल्याने त्यांचा ठपका देखील पक्षश्रेष्ठींवर देण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या काही खंद्या समर्थकांनी भाजपाला सोड चिट्टी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यात कन्हैरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य विकास भुजाडे, आडगाव टप्पा येथील बाजार समितीचे माजी संचालक निवृत्ती घुले, उद्धव शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, सुतारखेडे ग्रामपंचायतीचे सदस्य आबा गांगुर्डे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीरपणे प्रवेश करणार आहे. या जाहीर प्रवेशामुळे तालुक्यातील भारतीय जनता पक्षातील दुफळी चव्हाटयावर आल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे.
हेही वाचा :
- BCCI Plants 42000 Saplings : धोनीच्या सीएसकेची IPL फायनलमध्ये धडक, BCCI लावणार 42000 झाडे!
- विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर, मतदारसंघातील कामांसाठी भेटीगाठी घेणार असल्याची माहिती
The post भाजपला धक्का! चांदवड तालुक्यातील नाराज गट करणार शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.