मालेगावात मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाचा खून, संशयिताला बेड्या

मालेगाव मर्डर

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा-शहरातील संगमेश्वर भागातील सांडवा पूलासमोर सोमवार (दि.15) रोजी रात्रीच्या वेळी मागील भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीस ताब्यात घेतले असून अन्य एक आरोपी फरार आहे.

संगमेश्वर भागातील इसाक चौक येथे रफिक खान अन्वर खान (रा. संगमेश्वर) हा त्याच्या दोन मित्रांसोबत कमानीच्या बाजुला उभा असताना त्याचा मित्र रफिक शहा अमिन शहा उर्फ लम्बा रफिक व त्याच्या सोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळुन मागील भांडणाची कुरापत काढून रफिक यास शिवीगाळ करून धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर, हातावर व मांडीवर वार करून जिवे ठार मारले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहायक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधु, सहायक पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी यातील आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश छावणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील मुख्य आरोपी रफिक शहा उर्फ लम्बा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याचे खात्रीशीररित्या समजले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्हयातील मुख्य आरोपी रफिक शहा यास ताब्यात घेतले. त्यास विश्‍वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार फैसल (पुर्ण नाव माहित नाही) याच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा –

The post मालेगावात मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाचा खून, संशयिताला बेड्या appeared first on पुढारी.