वणी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

अतिक्रमण विळखा वणी www.pudhari.news

वणी, अनिल गांगुर्डे- वणी शहरात पिंपळगांव रस्ता ते शाहु महाराज चौका पर्यंत तसेच शहरातील अनेक भागात बेशिस्त पार्किंग व दुकानदारांनी रस्त्यावर दुकाना समोर मांडलेले साहित्याच्या अतिक्रमणा मुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुक कोंडी होत आहे. शहरातील सुज्ञ व प्रतिष्ठित व्यापारी पदाधिकारीच रस्त्यावर बाजार मांडून बसले असल्याने अडचणीचे झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा वणी पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांकडून उमटत आहे.

ग्रामविकास अधिकारी यांनी शहरात फेरफटका मारून या बाबींवर कारवाई करणे अपेक्षित आहे. लग्न सराईचा हंगाम असल्याने शहरातील वर्दळ वाढली आहे. त्यात रस्त्यावरील अश्या अडथळयाने वाहतूक कोंडी होतांना दिसत आहे. तसेच शहरातील रस्त्यावर वाहन चालविणे कठीण होत चालले आहे. शहरात प्रवेश करणा-या भगवती शाॅपींग सेंटर समोरील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात बेशिस्त वाहतूक नेहमीच असते तसेच दुकानांचे फलक रस्त्यावर लावण्यात येतात. अनेक व्यावसायिक आपल्या दुकानातील माल दुकानाच्या पुढे लावण्यास सुरुवात केली असुन रहदारीचा असलेला रस्ता अगदी चिवळ झाला आहे. त्यामुळे थोडी गर्दी होताच वाहतूक कोंडी होते. वणी ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु तसे घडत नाही. अनेक व्यावसायिक दुकान सोडून रस्त्यांवर माल लावतात त्यापुढे व्यावसायिकांच्या दुचाकी त्यामुळे तीस चाळीस फुटांचे रस्ते दहा बारा फुटांवर येऊन ठेपले. याचे गांभीर्य कुणालाच नाही. वणी पोलीस यंत्रणेने ही थोडफार दखल घेतली तर निश्चितच फायदा होईल. पोलीसांनी गावातील गस्ती दरम्यान कारवाई करणे अपेक्षित आहे. अनेक वाहने विनाकारण रस्त्यांवर उभी करुन निघुन जातात. शहरातील वाहतूक व रस्त्यांवर दुकानदारांचे अतिक्रमण मोठी समस्या झाली आहे. वणी ग्रामपंचायत प्रशासन तसेच वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची या संदर्भात योग्य ती दखल घेतली पाहीजे. वणी काॅलेज रोड मोठा असुन ही बेशिस्त वाहनचालक कश्याही कुठेही आडवी तिरपी वाहने उभी करतात त्यामुळे मोठा रस्ता असण्याचा फायदा नाही. कांद्याचे वाहतूक करणारे ट्रॅक्टर याच मार्गावरून जात असून त्यामुळेच मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते. याबाबत पोलिसांनी दखल घेतली पाहीजे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुकाने लावले जात असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. याबाबत शहरात अश्या दुकानदारांना सुचना देऊन एक दिवसाचा कालावधी देण्यात येईल त्यांनी नाही ऐकल्यास ग्रामपंचायत प्रशासन रस्त्यावर अडथळा ठरणा-या वस्तु व दुकानाचा बाहेर लावलेला माल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून जप्त करुन कायदेशीर कारवाई केली जाईल.- संजय देशमुख, ग्रामविकास अधिकारी वणी

हेही वाचा –