नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवावर्गाला साद घातल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्यापासून (दि.१४) दोनदिवसीय नाशिक व जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून, संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिकमधून देशातील युवावर्गाला साद घातली होती. त्यानंतर ठाकरे गटाने राज्यस्तरीय अधिवेशनाचे नाशिकमध्ये आयोजन करत भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नाशिकमध्ये येत निवडणुकीचे वातावरण अधिकच तापवले. आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता तोंडावर असताना ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाशिक व जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. बुधवारी(दि.१४) नाशिक लोकसभा मतदारसंघातील इगतपुरी, सिन्नर आणि नाशिकमधील जेलरोड परिसरात त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून ते युवा शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता ते जळगाव दौऱ्यासाठी रवाना होतील. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली, कासोदा, भडगाव येथे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
अमित ठाकरेही गुरुवारी नाशिकमध्ये
आदित्य ठाकरे गुरुवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तर याच दिवशी मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे गुरुवारी(दि.१५) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मनसेच्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसेदेखील जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
हेही वाचा:
- भाकरीचा चंद्र आवाक्यात; ज्वारीच्या दरात घसरण
- वजन घटवणार्या औषधांमुळे आकसू शकतात स्नायू
- जेसीबी’चे खरे नाव काय? रंग पिवळाच का असतो?
The post संवाद मेळावा : नाशिकसह जळगावचा दोन दिवसांचा दौरा appeared first on पुढारी.