इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यातील धामणी येथे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग झाले होते. त्यामुळे अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन पडझड झाली असून शेतातील जलवाहिनींचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी, म्हणून धामणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गांगडवाडी येथील आदिवासी महिलांचे ११ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र त्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सपशेल पाठ फिरवली आहे.
भाकरीचा चंद्र शोधण्यातच दिनचर्या जाणाऱ्या आदिवासी महिलांना आपले घरे वाचविण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे. प्रशासन दखल घेत नसल्याने पोराबाळांसह थेट तहसीलदारांच्या दारात ठिय्या देण्याचा निर्धार उपोषणकर्त्या महिलांनी केला आहे.
जीव्हीपीआर कंपनीने समृद्धी महामार्गाचे काम करताना डोंगरावर सुरुंग लावून तथील खडक फोडला. तीन वर्षात अनेक वेळा ब्लास्टींग झाले. त्यातून आदिवासी वस्तीतील घरांना आणि भिंतीना तडे गेले आहेत. परंतु, कंपनीने कोणत्याही स्वरुपात नुकसानभरपाई दिलेली नाही. भरपाई आणि ‘समृद्धी’लगतचे सर्विस रस्ते जोपर्यंत दुरुस्त करून मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे. यावेळी भागाबाई गांगड, संगीता गांगड, यशोदा गांगड, वालाबाई गांगड, राहिबाई आगीवाले, सगुणा गांगड, स्क्राबाई गांगड, सवित्रीबाई आगीवाले, लीलाबाई गांगड, संगीता गांगड, सोनाबाई गांगड, सोनुबाई गावन्डे, देवकबाई गांगड आदी महिला उपस्थित होत्या.
हेही वाचा :
- दोन वधूंसह विवाहासाठी त्याने गाठले मलेशिया!
- Rahul Gandhi : ‘जियो और आप लोग मरो’… काय म्हणाले राहुल गांधी
- Lok Sabha Election 2024 | महायुतीचे ठरले : शिंदेंना १३ तर अजितदादांना ४ जागा; भाजप ३१ जागांवर लढणार?
The post 'समृद्धी'च्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, नुकसानभरपाईसाठी ११ दिवसांपासून महिलांचे उपोषण appeared first on पुढारी.