सूरज मांढरे : आयएटीई ५६ व्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

मुक्त विद्यापीठ pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय शिक्षण पद्धती ही जगातील उत्तम पद्धती आहे. पण, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दिले जाणारे ज्ञान हे तपासून बघायची वेळ आली आहे, त्याकरिता शिक्षण व शिकवणे यातील अंतर कमी होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.

यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील प्रा. राम ताकवले संशोधन केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (आयएटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयए‌टीईच्या ५६ व्या राष्ट्रीय परिषदेचा सोमवारी (दि.१२) समारोप झाला, त्या प्रसंगी मांढरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. व्यासपीठावर आयएटीईचे अध्यक्ष प्रा. मोहम्मद मियान, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, माजी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, डॉ. कविता साळुंके, प्रा. बी. आर. कुक्रेती, डॉ. संजीवनी महाले आदी उपस्थित होते.

सूरज मांढरे म्हणाले परिषदांमधून विचारांच्या देवाण घेवाणसह चांगले ज्ञान प्राप्त होते, शिक्षकांना या ज्ञानाचा अध्यापनामध्ये होईल. जगाला भारताकडून खूप मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीबाबत अपेक्षा निर्माण झाल्या आहेत, भारताचे भविष्य नवीन पिढीसाठी खूप उज्ज्वल असल्याचे मांढरे यांनी सांगितले. यावेळी प्रा. संजीव सोनवणे व प्रा. मोहम्मद मियान यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अनिल कुलकर्णी, डॉ. जयदीप निकम, कुलसचिव दिलीप भरड, तसेच विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह देशभरातून आलेले मान्यवर उपस्थित होते.

परिषदेमध्ये यांचा सन्मान
डॉ. आशा ठोके यांनी परिषदेचा तीन दिवसांचा अहवाल सादर केला. परिषदेत देशभरातून आलेले २५० हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदविला. यावेळी ९३ पेपरचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उत्तम पेपर सादरीकरणासाठी पुण्याच्या शिवाजी विद्यापीठाच्या अपराजिता कनोजिया व रुपाली संकपाळ तसेच नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे डॉ. अलोककुमार उपाध्याय व लक्ष्मीप्रभा जे. के. यांची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा:

The post सूरज मांढरे : आयएटीई ५६ व्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप appeared first on पुढारी.