हरवलेली पैशाची थैली शिक्षकास केली परत

पैशांची थैली केली परत,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील मंदिरात शालेय सहल घेऊन आलेल्या शिक्षकाची 25 हजार रुपयांची रोकड असलेली थैली मंदिर देवस्थान ट्रस्ट शिपायाच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली.

शुक्रवारी (दि. 29) दुपारच्या सुमारास बोईसर येथून खासगी संस्थेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आली होती. देवदर्शनानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक मंदिर प्रांगणात काही वेळ थांबले होते. त्यावेळी रमाकांत दामोदर संखे त्यांची पिशवी मंदिर प्रांगणात विसरले होते. सहल निघून गेल्यानंतर काही वेळाने मंदिराचे कर्मचारी दशरथ चारोस्कर यांना प्रांगणात बेवारस पडलेली छोटी पिशवी आढळली. तसेच या पिशवीत पैसे असल्याचे पाहून ती देवस्थान ट्रस्ट कार्यालयात जमा केली. प्रशासन अधिकारी अमित माचवे आणि सहकारी अमित टोकेकर यांनी पोलिस कर्मचारी सहायक उपनिरीक्षक राजेंद्र शेवाळे, पुजारी प्रशांत तुंगार यांच्या समक्ष पिशवी तपासली.

पिशवीमध्ये रोकड रक्कम 25 हजार रुपये आणि केबलचे बिल अदा केलेली पावती आढळली. त्या पावतीवरील मोबाइल क्रमांकावर देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने संपर्क साधला असता, तो बोईसर येथील शिक्षकाच्या घरी लागला. त्यांना पैशाची पिशवी सापडल्याची माहिती दिली. शिक्षकाच्या घरच्यांनी त्यांना कळवले. प्रवासात असलेले शिक्षक, विद्यार्थी पैसे नेमके कोणत्या ठिकाणी हरवले या विवंचनेत होते. त्यांना घरून फोन आला व ते पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिरात आले. देवस्थान ट्रस्ट कर्मचारी आणि पोलिस यांनी खात्री पटवली व सर्वांच्या उपस्थितीत पैशाची थैली परत दिली. संबंधित शिक्षकाने देवस्थान ट्रस्टला लेखी पत्र देऊन आभार मानले. विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी देवस्थान कर्मचारी दशरथ चारोस्कर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. या सर्व घटनेचे साक्षीदार झालेल्या भाविकांनीही त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.

हेही वाचा :

The post हरवलेली पैशाची थैली शिक्षकास केली परत appeared first on पुढारी.