“अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ…’ शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा

ठाकरे गट शिवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीमध्ये खा. संजय राऊत यांच्या पाया पडून दोनदा खासदारकी मिळवणाऱ्या हेमंत गोडसे यांनी ८ वर्षांत जिल्ह्यात राबविलेले एकतरी लोकोपयोगी काम दाखवावे. शिवसैनिकांच्या कृपाशीर्वादाने दोनदा संसदेत पाेहोचलेले गोडसे हे खासदारकीचा चेहरा नसून, खा. राऊतांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा शब्दांत खा. हेमंत गोडसे यांना सुनावत ‘इथून पुढे राऊत किंवा एकाही शिवसैनिकाबद्दल अपशब्द वापरल्यास याद राखा. अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला.

खा. गोडसेंनी शनिवारी (दि. ३) शिवसेना (ठाकरे गट) नेते खा. राऊत यांच्यावर टीका केली होती. खा. राऊतांनी नाशिकमधून माझ्यासमोर खासदारकी लढावी, असे आव्हान दिले होते. त्यावर ठाकरे गटाने रविवारी (दि. ४) पत्रकार परिषद घेत गोडसेंना प्रत्युत्तर दिले. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, विलास शिंदे आदी उपस्थित होते. खा. राऊत यांच्या कृपाशीर्वादामुळे दोनदा खासदारकी मिळविलेल्या गोडसेंची नाशिकच्या प्रश्नावरून संसदेत त-त-फ-फ होते, अशी टीका करंजकर यांनी केली. द्राक्ष व कांदा निर्यातीवर केंद्राने बंदी घातली असताना, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गोडसे संसदेत किती वेळा भांडले? त्र्यंबकचे हेमाडपंती मंदिर, नाशिकचे सुंदर नारायण मंदिर, महिला वसतिगृह, पीसी हब, रेल्वेचा व्हील कारखाना आदींचे भूमिपूजन खा गोडसेंनी करून घेतले. पण, आजमितीस यातील एकाही प्रकल्पाचे लोकार्पण झाले नसून, मंत्र्यांकडे निवेदने देण्यापलीकडे गोडसेंनी काहीही केले नाही, असा आरोप करंजकरांनी केला. आमदारांच्या कामांवर पाेळी भाजून घेणाऱ्या गोडसेंसाठी खा. राऊत यांनी दोनदा नाशिककरांकडे मते मागितल्याची आठवण बडगुजर यांनी करून दिली. वसंत गिते यांनी, गोडसेंची राजकीय घडी आम्हीच बसवली असून, सत्ता लोभापायी ते शिंदे गटात गेले. परंतु, नाशिकची जनता सुज्ञ असून, ते कधी कोणाला डोक्यावर घेतील, अन‌् कोणाला आपटवतील याचा इतिहास गोडसेंना माहिती नसल्याची टीका केली.

मुलाला निवडून आणू शकले नाहीत : बडगुजर

मुख्यमंत्र्यांच्या तिरडी यात्रेत सहभागी झालेले खा. गोडसे आठच दिवसांत शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले. आता पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे व गोडसे हे पक्षप्रवेशासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आर्थिक आमिषे दाखवत आहेत. परंतु, स्वत:च्या मुलाला जिल्हा परिषदेत निवडून आणू शकले नाहीत, अशा शब्दांत सुधाकर बडगुजर यांनी खा. गोडसेंवर निशाणा साधला.

हेही वाचा:

The post "अंगावर आलात, तर शिंगावर घेऊ...' शिवसेना ठाकरे गटाकडून खा. गोडसे यांना इशारा appeared first on पुढारी.