अधिकमासात जावयाला ‘फॅन्सी’ चांदीचे वाण

अधिकमासात जावयाला 'फॅन्सी' चांदीचे वाण

नाशिक, वैष्णवी करमासे

तब्बल १९ वर्षांनी जुळून आलेल्या श्रावण अधिकमासात जावयाला वाण म्हणून देण्यासाठी अत्यंत आकर्षक अन् फॅन्सी चांदीच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये फॅन्सी दिवे, लामण दिवे, निरंजन, नंदादीप यासह कासव आणि फुलांचे ग्राहकांमध्ये विशेष आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. यंदा चांदीचा दर अधिक असला तरी, जावयांसाठी भेटवस्तू देण्यासाठी या वस्तू खरेदीकरिता ग्राहकांची सराफ बाजारात गर्दी होत आहे.

विभक्त कुटुंबामुळे एका कुटुंबात एक किंवा दोनच मुली असल्याने गेल्या काही काळापासून अधिकमासातील जावयांचे कौतुक मागील पिढ्यांच्या तुलनेत वाढले आहे. अधिकस्य अधिक फलम या सुभाषितानुसार अधिकमासात केलेले दान शुभ मानले जात असल्याने मंदिरांमध्येही सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची पद्धत रुढ होताना दिसत आहे. तसेच चांदीची जोडवी नवी करून घेणे किंवा जुन्या जोडव्यातील चांदी वाढवून घेणे, पायाच्या तिसऱ्या बोटामध्ये घातली जाणारी बिच्छवे व पायातील पैंजण खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.

अधिकमासात दीपदानाला अधिक महत्त्व असल्याने चांदीच्या दिव्यांचे अनेक प्रकार सध्या बाजारात आले आहेत. त्यामध्ये चांदीचे निरंजन, नाशिक घाटाची समई, फॅन्सी नक्षीची समई, नंदादीप, लामनदिवा आदींचा समावेश आहे. फॅन्सी प्रकारातील देवदास दिवा आकर्षण ठरत आहे. त्याचबरोबर बेलाची पाने, ताट, फळांचे बाऊल, विविध देवतांच्या चांदीच्या मूर्तीदेखील खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चांदीचे ताट, पणती, वाटी, तांब्या, पेले, चेन, अंगठी या वस्तूंनादेखील मोठी मागणी असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

३३ अनारसे वाण

अधिक मास हा ३३ दिवसांचा असतो. त्यामुळे या महिन्यात ३३ या अंकाला विशेष महत्त्व आहे. जेवणात ३३ अनारसे व इतर तळणातले पदार्थ देण्याची पद्धत आहे. त्यामुळे रेडीमेड तळणातल्या पदार्थांनादेखील मागणी आहे. एकंदरीत अधिकमासामुळे बाजारातील उलाढालीमुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अधिकमासात चांदीच्या वस्तूची खरेदी अधिक प्रमाणात होत असते. महिला जोडवीमध्ये चांदी वाढवून घेण्याचे काम याच महिन्यात करण्याची मोठी परंपरा आहे. यंदा चांदीच्या विशेष डिझाइन असलेल्या वस्तू बाजारात आल्याने, त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

– चेतन राजापूरकर, संचालक, इंडिया बुलियन व ज्वेलर्स असोसिएशन

हेही वाचा :

The post अधिकमासात जावयाला 'फॅन्सी' चांदीचे वाण appeared first on पुढारी.