अमित ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा

अमित ठाकरे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने, आगामी महापालिका निवडणुकीचे चित्रच बदलले आहे. अशात प्रत्येक पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर देत असतानाच, मनसेनेदेखील त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिरंजीव अमित ठाकरे यांच्यावर नाशिकची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार अमित ठाकरे हे नाशिक मनसेला बूस्ट देण्यासाठी येत्या 27, 28 डिसेंबरला नाशिक दौर्‍यावर येत आहेत. याबाबत मनसे पदाधिकार्‍यांची नुकतीच राजगड कार्यालयात बैठक झाली. त्यात दौर्‍याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

आगामी मनपा निवडणुकीची तयारी व संघटनात्मक बांधणीसाठी अमित यांचा हा दौरा असणार आहे. यात ते शाखाध्यक्षांशी वन टू वन संवाद साधणार आहेत. गत काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये बरीच उलथापालथ झाल्याचे दिसून आले. ठाकरे गटाच्या तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात उडी घेतल्याने ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. त्याचबरोबर आणखीही काही नेते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशात प्रत्येक पक्षाला आपल्या संघटनात्मक बांधणीची चिंता सतावत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. दरम्यान, एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या मनपावर पुन्हा मनसेचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता अमित ठाकरे यांना मैदानात उतरविण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविली जाण्याची शक्यता आहे.

बैठकीत तू-तू मैं-मैं
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या दौर्‍याबाबत राजगड येथे आयोजित बैठकीमध्ये माजी महापौर अशोक मुर्तडक व मनसे नेत्या सुजाता डेरे यांच्यात तू-तू, मैं-मैं झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत अमित ठाकरे यांच्या दौर्‍याबाबतचे नियोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post अमित ठाकरे यांचा दोन दिवसीय नाशिक दौरा appeared first on पुढारी.