आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : अपत्यानंतरही दत्तक मुलांचा आनंदाने स्वीकार

दत्तक www.pudhari.news

नाशिक : अंजली राऊत
मूल दत्तक घेण्यासाठी करावी लागणारी दत्तक प्रक्रिया शासकीय नियमानुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडावी लागत असल्याने यासाठी साधारणत: अडीच ते तीन वर्षांचा वेटिंग कालावधी लागतो. मात्र, तरीही दत्तकेच्छुक पालकांचा उत्साह तसूभरही कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे या कालावधीत संबंधित दत्तकेच्छुक दाम्पत्याला मूल झाले तरीही नोंदणी केल्यानुसार आनंदाने दत्तक मुलाचाही स्वीकार केला जात असून, ‘त्या’च्या पायगुणामुळेच अपत्यप्राप्ती झाल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते, अशी माहिती आधाराश्रम प्रशासनाकडून देण्यात आली.

आता जिल्हाधिकार्‍यांकडूनच होते प्रक्रिया…
दत्तक प्रक्रियेदरम्यान हे दत्तक पालक होम स्टडी, होम व्हिजिट, होम रिपोर्ट करणे अशा निरीक्षणाखाली असतात. ही सर्व प्रक्रिया बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये केली जाते. जिल्हा महिला बालविकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे दोन अधिकारी ही प्रक्रिया पार पाडत असतात. बालन्याय अधिनियमानुसार मुलांची काळजी आणि संरक्षण 2015 ह्या कायद्यात सन 2021 ला सुधारणा करण्यात आली असून, या सुधारणेनुसार अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया, जी पूर्वी न्यायालयातून होत असे त्याऐवजी ती आता जिल्हा दंडाधिकारी अर्थात जिल्हाधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे.

अशी होते पालक म्हणून नोंद…
दत्तक घेऊ इच्छिणार्‍या पालकांना भारतात येऊन ‘कारा’च्या अधिकार्‍यांना भेटावे लागते. तेथे त्यांची सर्व कागदपत्रे आणि याचवेळी त्यांची प्रत्यक्ष मानसिकताही तपासली जाते. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष मूल दाखवले जाते. यामध्ये एकूण तीन पर्याय दिले जातात. प्रत्यक्ष भेटीनंतर मग त्यांचा दत्तक पालकत्वासाठीचा अर्ज दाखल केला जातो. यावर प्रक्रिया व तपास पूर्ण करून मान्यता दिली जाते. त्यानंतरच मुलांचे नवे पालक म्हणून संबंधित दाम्पत्याची नोंद होते. तसा जन्मदाखला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळतो.

अनेक पालक ट्रीटमेंट घेऊनही अपत्यप्राप्तीसाठी विलंब झाल्याने अखेर दत्तक घेण्याचा विचार करतात. परंतु, असे दत्तक अपत्य बेकायदेशीरपणे घेऊ नये. आई-वडील होण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विहित नमुन्यातीलच अर्ज भरणे आवश्यक आहे. आम्ही त्यासाठी लीगल अ‍ॅडॉप्शन प्रमोशन करत आहोत. तसेच बेकायदेशीरपणे दत्तक अपत्य घेतल्यास सुमारे 1 लाख रुपये दंडासह 3 वर्षे सश्रम कारवासाची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त संस्थांमधूनच दत्तक मूल घ्यावे. रुग्णालय, वसतिगृह येथून बेकायदेशीरपणे दत्तक घेण्याचे टाळावे. कायदेशीर मूल दत्तक घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.         – राहुल जाधव, मुख्य दत्तक समन्यवयक, आधाराश्रम, नाशिक.

कुणाला नको असलेली बालके आम्हाला हवीत…
कोणालाही नको असणारी बालके आम्हाला हवी आहेत. शासनाच्या या सुंदर योजनेचा फायदा घ्या. कुठेही बेवारसपणे मूल सोडण्याऐवजी आमच्या येथे त्याला आणून द्या. त्यामुळे अशा मुलाला चांगले आरोग्य, निवारा, वस्त्र मिळून ‘सेफ अ‍ॅडॉप्शन सेफ सरेंडर’ हे प्रमोशन करणे आवश्यक आहे, असे आवाहन आधाराश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

वृद्धाश्रमासाठी जागेची गरज…
सन 1954 मध्ये स्थापन झालेल्या नाशिकमधील आधारश्रमाला 2029 मध्ये 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या अमृत महोत्सवाच्या द़ृष्टीने आधाराश्रमाला आता वृद्धाश्रमाची जोड भासत असल्याने दानशुरांनी पुढे येऊन जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन आश्रमाच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.

पालकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते. आधाराश्रमात दत्तक पालकांमध्ये जनजागृतीसाठी दत्तक मेळावा घेतला जातो. दत्तक पालकत्वासाठी येणार्‍या पालकांना साधारणत: कमीत कमी अडीच ते तीन वर्षांचा वेटिंग कालावधी दिला जातो. मात्र, त्यादरम्यान जर संबंधित दाम्पत्याला अपत्य झाले तरीही दत्तक अपत्याचे पालकत्व आनंदाने स्वीकारले जाते. दत्तक अपत्याच्या पायगुणामुळेच आई-वडील होण्याची संधी मिळाल्याचे मत दत्तक पालक आनंदाने व्यक्त करतात. तसेच, दाम्पत्य वा एकल माता पालकाला मुलगा किंवा मुलगी दोन्हीही दत्तक मिळू शकते. मात्र, एकल पिता पालकत्वाला केवळ मुलगाच दत्तक मिळू शकतो. – सुवर्णा जोशी, दत्तक समन्वयक, आधाराश्रम, नाशिक.

हेही वाचा:

The post आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : अपत्यानंतरही दत्तक मुलांचा आनंदाने स्वीकार appeared first on पुढारी.