आंतरराष्ट्रीय पर्वत दिन : महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अन् टीम पॉइंटची यशस्वी चढाई

पर्वतदिन www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व टीम पॉइंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरच्या वतीने 11 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन वजीर सुळक्यावर साजरा करण्यात आला. महासंघाचे प्रेमचंद अहिरराव यांच्यासह इतर गिर्यारोहकांनी अरोहणासाठी अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या शहापूर (जि.ठाणे) तालुक्यातील वांद्रे गावाजवळील सह्याद्री पर्वतरांगांतील वजीर सुळका सर केला. गिर्यारोहकांनी हाती भगवा ध्वज घेऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय’ घोषणा देत पर्वतांना सलामी दिली.

90 अंशाच्या काटकोनात अगदी सरळ रेषेतील 280 फूट उंच असलेला अतिशय अवघड असा वजीर सुळका सर करताना शारीरिक आणि मानसिक संतुलनाचा कस लागतो. सुळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी किमान दोन-अडीच तास उभा चढाव पार करत पायपीट करावी लागते. त्यानंतर अगदी अंगावर येणार्‍या सुळक्याचा निमुळता कठीण मार्ग हा काळजाची धडधड वाढविणारा असतो. हातापायांच्या मजबूत पकडीवर व उच्च मनोबलावरच हा सुळका सर होऊ शकतो. अशा महाकठीण वजीर सुळक्यावर आरोहण करणे खरोखरच जिकिरीचे काम असल्याचा अनुभव गिर्यारोहकांनी सांगितला. टीम पॉइंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरचे जॉकी, बन्नी, शशांक पगार, धनंजय पाटील, भटू पाटील, विवेक सूर्यवंशी, संकेत जाधव, निखिल देशमुख आदी गिर्यारोहकांनी परिश्रम घेत मोहीम फत्ते केली.

पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनात पर्वतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जैवविविधता टिकून राहावी, यासाठी पर्वतराजीही अखंड टिकून राहणे महत्त्वाचे आहे. म्हणून आजचा दिवस हा वजीर सुळक्यावर साजरा करून पर्वतांना मानवंदना देण्यात आली. – प्रेमचंद अहिरराव.

हेही वाचा:

The post आंतरराष्ट्रीय पर्वत दिन : महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अन् टीम पॉइंटची यशस्वी चढाई appeared first on पुढारी.