दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ….

भोसला www.pudhari.news

नाशिक : 

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांना स्वातंत्र्यापूर्वीच सैनिकी शिक्षणाचे महत्त्व लक्षात आले. सशक्त राष्ट्राच्या उभारणीसाठी भारतीय तरुणांना लष्करी प्रशिक्षणाची अपरिहार्यता यावर त्यांचा ठाम विश्वास होता. ‘जोपर्यंत राष्ट्र सैन्यदृष्ट्या मजबूत होत नाही, तोपर्यंत ते इतर राष्ट्रांमध्ये आपले डोके उंचावू शकत नाही.’ असे ते म्हणत.‘ज्ञानाची शक्ती आणि शक्तीचे ज्ञान’ हे लष्करी शिक्षणाचे त्यांचे ब्रीदवाक्य होते. मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.

आज डॉ. मुंजेच्या 150व्या जयंतीनिमित्त संस्थेने शैक्षणिक स्तरावर सर्व प्रकारच्या गुणवत्तावाढीचा प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला आहे. अद्ययावत सैनिकी शिक्षणासाठी अभ्यासक्रम, शिक्षणस्वरूप बाबींचे पुनरावलोकन संस्था करत आहे. एक शैक्षणिक संस्था म्हणून भोसला नियमितपणे विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत नीतिमूल्ये, देशभक्ती, नेतृत्व आणि शिस्त या महत्त्वपूर्ण गुणांच्या विकासासाठी प्रयत्न हे करत आहे. सैनिकी शिक्षणात काम करत असताना ‘संरक्षण’ या विषयातील बदलती आव्हाने लक्षात घेऊन संस्था देत असलेल्या शिक्षणामध्ये संरक्षण विषयाच्या शिक्षणाच्या अनेक नवीन आयामांचा अंतर्भाव किंवा सीमा सुरक्षा एवढाच मर्यादित विषय न ठेवता अंतराळ (स्पेस) सुरक्षा, सायबर सिक्युरिटी तसेच वॉटर डोमेन सिक्युरिटी अशा नवीन आयामांचा विचार करावा लागणार आहे आणि त्यासाठी नवीन पिढीला तयार करावे लागणार आहे, याचे संस्थेला निश्चितच भान आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात कालसुसंगत असे बदल करावे लागतील आणि सुरक्षाविषयक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे प्रबोधन, संरक्षणविषयक जागृती आणि सैनिकी शिक्षणाचा प्रसार (या त्रिसूत्रीच्या माध्यमातून संस्थेला या पुढील वाटचाल करावी लागणार आहे. संस्थेने यावर्षी मुलींच्या शिक्षणावरदेखील भर देऊन त्यांची एनडीए परीक्षेसाठी पूर्वतयारी करत आहे. डॉ. मुंजे यांनी मुलींच्या शिक्षणासंबंधी जे स्वप्न पाहिले होते की, ‘मुलांसोबत मुलींना ही देशाच्या संरक्षणाच्या शिक्षणासाठी दरवाजे खुले असावे.’ अशी त्यांची ही दूरदृष्टी होती. केंद्र सरकारनेसुद्धा एनडीए प्रशिक्षणाला मान्यता दिली आहे.
आज देशाला सीमा सुरक्षित करण्यासाठी सक्षम अधिकार्‍यांची आवश्यकता आहे. भोसला विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवा आणि सामाजिक सुरक्षेची जाणीवही निर्माण करते. भोसला निवासी विद्यार्थ्यांसाठी जसे सैनिक शिक्षण देते तसेच अनिवासी विद्यार्थ्यांसाठी अर्थात केजी टू पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्तीचे बाळकडू निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर भोसला मिलिटरी कॉलेज, डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स, नर्सिंग कॉलेज यांसारखी युनिट सुरू आहेत. लष्करी अधिकारी घडवण्यासाठी भोसला प्रयत्नशील आहेच. तसेच सेवा, व्यवस्थापन, स्वयंरोजगार, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांत नावलौकिक मिळवणारे व्यक्तिमत्त्वही घडवत आहेत. जे अनिवासी विद्यार्थी आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीनंतर एनडीए प्रशिक्षण घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची सोय व्हावी म्हणून ‘भोसला करिअर अकॅडमी’ कार्यरत आहे व त्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेची पूर्वतयारीदेखील येथे करून घेतली जाते. यामुळे नाशिक व नाशिक परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता आला आहे.

एनडीएच्या परीक्षेची जशी तयारी करून घेतली जाते तशीच एसएसबीच्या परीक्षेचीदेखील तयारी करून घेतली जाते. भोसला करिअर अकॅडमीच्या माध्यमातून एसएसबी ट्रेनिंगच्या मैदानी प्रशिक्षणासाठी लागणारी उपकरणे व प्रशिक्षण हे डॉ. मुंजेंच्या सार्धशतीच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आले आणि आज ही अकॅडमी एसएसबीची पूर्ण ट्रेनिंग देणारे केंद्र म्हणून प्रथम पसंतीस येत आहे. संस्था पदाधिकार्‍यांसाठी सार्धशतीचे वर्ष हे संस्थेच्या दृष्टिकोनातून सिंहावलोकन करून पुढे अधिक कुठे आणि कशी झेप घ्यायची आहे, याविषयीचा विचार व निर्णय पक्का करण्याची एक संधी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भोसला हे भारत देशातील मिलिटरी, एनडीए, एसएसबी यांसारखे संरक्षण क्षेत्रातील प्रशिक्षण देणारे अभ्यास केंद्र म्हणून राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. देशाच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलणारी संस्था नाशिकमध्ये स्थापन करणार्‍या डॉ. मुंजेंना त्यांच्या या सार्धशती जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन..!

– सीएमए हेमंत देशपांडे, कार्यवाह, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी.

रामदंडी मिलिटरी प्रशिक्षण
अनिवासी विद्यार्थ्यांना लष्करी शिक्षणाची ओळख व्हावी म्हणून सातवी ते आठवी या इयत्तेसाठी दोन वर्षांचा दर रविवारी दोन तास असा ‘रामदंडी मिलिटरी प्रशिक्षण’ देण्यात येते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो आणि त्यांना देशसेवेची आवडही निर्माण होते. अशा प्रकारचे शिक्षण देणारी भोसला ही एकमेव संस्था आहे.

The post दै. पुढारी विशेष शैक्षणिक : भोसला सैनिकी शिक्षणाचे आद्यपीठ.... appeared first on पुढारी.