उत्तर भारतातील पुराने मध्य रेल्वेची दाणादाण, लांब पल्ल्याच्या गाड्यांना तब्बल १५ तास विलंब

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जम्मू-काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारतात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होऊन ती विस्कळीत झाली आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब आदी भागांतून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या दोन ते १५ तास उशिरा धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

मान्सून सुरू झाल्यानंतर त्याने उत्तर भारतात हाहाकार उडविला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, जम्मू-काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व नद्यांना महापूर आल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाऊस आणि पुरामुळे तेथे रेल्वे वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. उत्तर भारतातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत आहेत. त्यात हावडा-मुंबई मेल, गोरखपूर-कुर्ला काशी एक्स्प्रेस, जयनगर-कुर्ला पवन एक्स्प्रेस, कामाख्या-कुर्ला कुशीनगर एक्स्प्रेस, अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस, जम्मूतावी-पूना झेलम एक्स्प्रेस, निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस, कालका-शिर्डी एक्स्प्रेस, वाराणसी-हुबळी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. गाड्यांना तासनतास उशीर होत असल्याने प्रवाशांना फलाटावरच मुक्काम करावा लागत आहे.

हेही वाचा : 

The post उत्तर भारतातील पुराने मध्य रेल्वेची दाणादाण, लांब पल्ल्याच्या गाड्यांना तब्बल १५ तास विलंब appeared first on पुढारी.