उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही-लाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसपलीकडे पोहोचला आहे. उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. उन्हाचा वाढलेला तडाखा बघता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक जिल्ह्यांच्या तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातही तापमानात वाढ झाल्याने तीव्र उकाडा सहन करावा लागत आहे. या जीवघेण्या उकाड्यामुळे सामान्यांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. पुढील काही दिवस आणखी उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

उन्हावेळी काय करावे
पुरेसे पाणी प्यावे. तहान लागली नसली, तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे व झडपांचा वापर करा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी तयार केलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावी. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यास पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास अधूनमधून विश्रांती घ्यावी. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.

उन्हात काय करू नये
उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व उभ्या केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.

The post उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही-लाही appeared first on पुढारी.