एअर अलायन्सचा निर्णय :नाशिकहून चार मार्गावरील विमानसेवा बंद

विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सुरू असलेली एअर अलायन्स कंपनीकडून विमानसेवा बंद केली जाण्याची शक्यता आहे. उडान योजनेचा कालावधी संपल्याचे कारण देत विमानसेवा बंद करण्याबाबतची माहिती समोर येत असली तरी, एअर अलायन्स कंपनीसंदर्भात एव्हिशन मंत्रालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीमुळे ही सेवा बंद केली जात असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. १ नोव्हेंबरपासून तब्बल चार शहरांचा कनेक्ट तुटणार असल्याने त्याचा नाशिकच्या विकासाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने देशभरात उडेगा आम आदमी (उडान) योजनेअंतर्गत चार वर्षांपासून ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू केली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दीड वर्षे विमानसेवा बंद करण्यात आली होती. मागील वर्षी २१ हजार प्रवाशांनी ओझर विमानतळावरून प्रवास केल्याने केंद्र सरकारच्या उडान योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण देशभरात उडान योजनेअंतर्गत नाशिक येथील विमानसेवा फायद्यात असल्याचे स्पष्ट झाले. उडान योजनेअंतर्गत दुसऱ्या क्रमांकावर नाशिकचा क्रमांक लागतो. कोरोनानंतर विमानसेवा पूर्ववत झाल्यानंतरदेखील मोठा प्रतिसाद मिळाला. दीर्घकाळ विमानसेवा चालून नाशिकच्या आयटी उद्योगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत असताना अचानक विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता, अलायन्स एअर कंपनीची सेवा बंद होत असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब गंभीर असून, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

या चार सेवा बंद….. 

नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली व नाशिक-पुणे-बेळगाव या सेवा बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा:

The post एअर अलायन्सचा निर्णय :नाशिकहून चार मार्गावरील विमानसेवा बंद appeared first on पुढारी.