एसआयपीतून धनवर्षाव अन् ब्लूचिप फंडाची गगनभरारी

गुंतवणूकीच्या विश्वात www.pudhari.news

नाशिक : -राजू पाटील

गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या योग्य वातावरणात गुंतवणूक करत पोर्टफोलिओ तयार करण्याची उत्तम संधी असून, तिचा पुरेपूर वापर एसआयपीतून करणे चाणाक्ष रणनीती ठरेल.

मान्सून दाखल होण्यासाठी अद्याप आठवडा आहे, परंतु एसआयपीच्या माध्यमातून शेअरबाजारात सध्या निधीचा जोरात पाऊस सुरू आहे. त्याचे आकडे डोळ्यांना सुखावणारे आणि अर्थतज्ज्ञांना धक्का देणारे ठरले आहेत. भारतीय शेअरबाजारात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मार्गाने येणारा गुंतवणुकीचा ओघ एप्रिलमध्ये १३,७२८ कोटी रुपयांवरून मे महिन्यात 14 हजार 749 कोटी रुपयांवर पोहोचला. जून 2022 मध्ये निफ्टीने 15500 अंशांच्या तळपातळीला स्पर्श केल्यानंतर एसआयपीचा ओघ कमी होईल, अशी भीती तयार झाली होती. परंतु ती फोल ठरली. जून २०२२ मध्ये एसआयपीतून १२ हजार २७६ कोटी रुपयांचा निधी आला होता. त्यानंतर बाजार सलग सात ते आठ महिने हेलकावे खात असताना एसआयपीच्या निधीत दरमहा शंभर ते तीनशे कोटी रुपयांदरम्यान चढउतार होत एसआयपीतून गुंतवणूक वाढत चालली आहे. या वाढणाऱ्या निधीतूनच भारतातील छोट्या गुंतवणूकदारांचा भारतीय शेअरबाजारवरील ठाम विश्वास प्रकट झाला. मे 2023 पर्यंत म्युच्युअल फंड उद्योगाकडे गुंतवणुकीपोटी जमा झालेला एकूण निधी 41 लाख 61 हजार कोटींवरून वाढून 43 लाख 20 हजार कोटी रुपयांवर झेपावला आहे. हा एकूण निधी लार्ज कॅप म्हणजेच ब्लूचिप फंड, मिड आणि स्मॉल कॅप तसेच डेट फंडाचा वाटा किमान ७० टक्के आहे. थोडक्यात म्युच्युअल फंड म्हणजे काय हे शहरांपेक्षा अगदी छोट्या छोट्या गावांतील गुंतवणूकदारांच्या पचनी पडले आहे.

भारतीय गुंतवणूकदारांमध्ये सुरुवातीच्या काळात अनेक ब्लूचिप फंड (लार्ज कॅप फंड) लोकप्रिय झाले. लार्ज कॅप फंडात मिरे ॲसेट, आदित्य बिर्ला सन लाइफ, एसबीआय ब्लूचिप, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड, एचडीएफसी टॉप हंड्रेड, युटीआय मास्टरशेअर हे आजही लोकप्रिय फंड आहेत. या फंडामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदांनी जवळपास पावणेदोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, सरासरी १६ ते १८ टक्के इतका परतावा १० वर्षांत कमविला आहे. डोळस राहून केलेली गुंतवणूक भविष्यासाठी योग्य अशी पुंजी तयार करते, हेच या पाच-सहा फंडांच्या गेल्या १० वर्षांतील कामगिरीतून दिसून आले. मिडकॅप तसेच स्मॉलकॅप समभागांच्या तुलनेत लार्ज कॅप समभाग हे प्रामुख्याने कमी अस्थिर असतात. ज्यांना हे रहस्य कळले, त्या गुंतवणूकदारांनी एक, तीन, पाच आणि १० वर्षांच्या कालावधीत बक्कळ कमाई केली.

पंधरा वर्षांत कमाई जोरात

सर्वांत मोठ्या लार्ज-कॅप फंडांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंडाने मेमध्ये आपला १५ वर्षांचा कार्यकाल नुकताच पूर्ण केला. या फंडाकडे 31 मे 2023 अखेरीस 37 हजार 16 कोटी रुपयांचा निधी आहे. मे 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकटाच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या योजनेने व्यापार युद्धे, मध्यवर्ती बँकांनी घटवलेली रोखेखरेदी (टेपर टँट्रम्स), भू-राजकीय तणाव आणि व्याजदरातील चक्र यासाख्या आव्हानात्मक चढउतारातून कौशल्यपूर्ण पध्दतीने वाटचाल करत गुंतवणूकदारांना घसघशीत कमाई करुन दिली आहे.

एकरकमी गुंतवणूकीतून संपत्तीचा प्रवास

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड 23 मे 2008 रोजी सुरू झाला. तेव्हापासून या योजनेने 13.98 टक्क्यांचा चक्रवाढ दर दिला आहे. म्हणजेच या फंडाच्या एनएफओदरम्यान एखाद्याने गुंतविलेल्या दहा लाख रुपयांचे मूल्य आजच्या घडीस 71.5 लाख रुपये असते, असा त्याचा अर्थ होय.

एसआयपीतून घसघशीत संपत्तीनिर्मिती

एसआयपीच्या माध्यमातून या योजनेच्या प्रारंभापासून केलेल्या गुंतवणूकीवर आत्तापर्यंत 14 टक्क्यांचा चक्रवाढ वार्षिक परतावा मिळालेला आहे. एसआयपीच्या माध्यमातून दरमहा सलग पंधरा वर्ष केलेल्या दहा हजार रुपयांच्या गुंतवणूकीचे मूल्य आजच्या घडीस 56.4 लाख रुपये आहे. योजनेच्या शुभारंभापासून आत्तापर्यंत 69 टक्के तर पाच वर्षांच्या कालावधीत 12 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा या योजनेतून मिळालेला आहे. या योजनेने ऑटो, औद्योगिक उत्पादने आणि कॅपिटल गुडस् तसेच टेलिकॉम क्षेत्रावर सर्वाधिक भर दिला आहे. याच क्षेत्राने भारतीय अथव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे नेण्याकडे मोलाचे योगदान दिलेेल आहे. समभाग आणि क्षेत्रांना त्याच्या आधारभूत निर्देशांकापेक्षा वेगळे प्रमाण (वेटेज) असलेला पोर्टफोलिओ तयार करून ब्ल्यूचिप फंड योजनेचा आधार घेत एखादी व्यक्ती नानाविध शक्यतांना तोंड देण्याचे आणि लार्जकॅप श्रेणीमध्ये चांगला परतावा मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो, हे या उदाहरणातून सिध्द झाले आहे.

नवनवीन फंडांचे आगमन

भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि तंत्रज्ञान-आधारित वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेल्या बजाज फिनसर्व्ह लिमिटेडने बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड अंतर्गत त्यांच्या नवीन म्युच्युअल फंड व्यवसायाची सुरूवात करण्याची महत्वपुर्ण घडामोड बाजारासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे. बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड फिक्स्ड इन्कम, हायब्रीड आणि समभाग अशा श्रेणींमध्ये सात नवीन फंड बाजारात आणणार आहे. प्रारंभीच्या काळात फिक्स्ड इन्कम, लिक्वीड(तरल), ओव्हरनाईट आणि मनी मार्केटसारखे फंड आणणार आहे. बजाजसारखा अव्वल खेळाडू म्युच्यूअल फंड क्षेत्रात आल्याने गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी आणखी एक नवीन पर्याय मिळाला आहे. बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंडाने सात योजना सेबीकडे दाखल केल्या होत्या. या योजनांत लिक्विड फंड, मनी मार्केट फंड, ओव्हरनाइट फंड, आर्बिट्रेज फंड, लार्ज आणि मिड-कॅप फंड, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड यांचा समावेश होता. बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड हे गुंतवणूक प्रकार पुढील ३० दिवसांत बाजारात टप्पाटप्प्याने आणणार असल्याने भारतीय म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक आणखी वाढणार आहे.

फोकस्ड इक्विटी फंड

बजाजबरोबरच आयटीआय म्युच्युअल फंडाने आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी आणला आहे. बारा जूनला बंद होणाऱ्या या फंडात प्रामुख्याने 30 कंपन्यांच्या भांडवली बाजारमूल्यात गुंतवणूक करणारा अत्यंत केंद्रित असा पोर्टफोलिओ असणार आहे. दीर्घ मुदतीत भांडवलाची वृध्दी हव्या असणाऱ्या गुंतवणूकदारांना हा फंड नामी संधी आहे.

The post एसआयपीतून धनवर्षाव अन् ब्लूचिप फंडाची गगनभरारी appeared first on पुढारी.