खानदेशातील धन्वंतरी हरपला : स्व.डॉ.भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

स्व.डॉ.भाईदास पाटील www.pudhari.news

धुळे: पुढारी वृत्तसेवा

स्व. डॉ.भाईदास पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे जनक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेसाठी वाहीले. आपले कार्य आणि सेवेतून स्व. डॉ.भाईदास पाटील यांनी असंख्य डॉक्टर घडविण्याचे काम केले. त्यामुळे डॉक्टरांचे पितामह आणि राजकारणातील मार्गदर्शक हरपल्याच्या दु:खद भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ज्येष्ठ बंधु आणि धुळे येथील वैद्यकीय क्षेत्रातील भीष्माचार्य स्व.अण्णासाहेब डॉ. भाईदास चुडामण पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.23) धुळ्यात शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. राज्यातून यावेळी विविध माध्यमातून वैद्यकीय तसेच राजकीय क्षेत्रातून शोकसंदेशातून राज्यातील मान्यवरांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या.

अंत्ययांत्रेत उत्तर महाराष्ट्रातून प्रचंड मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ज्येष्ठ बंधु व आ.कुणाल पाटील यांचे काका आण्णासाहेब डॉ. भाईदास चुडामण पाटील यांचे वृध्दाकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.23) रोजी दु.12 वा. जवाहर मेडीकल फाऊंडेशनचे एसीपीएम मेडीकल कॉलेज मोराणे प्र.ल.धुळे येथे शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी स्व.डॉ.भाईदास पाटील यांच्याविषयी आठवणी जागवत आपल्या श्रध्दांजलीतून भावना व्यक्त केल्या. दरम्यान अंत्ययात्रेप्रसंगी झालेल्या शोकसभेत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, भाजपाचे संजय शर्मा,अ‍ॅड.एम.एस.पाटील आदी मान्यवरांनी श्रध्दांजली व्यक्त केली.

खा.डॉ.सुभाष भामरे- 

स्व.आण्णासाहेब डॉ.भाईदास पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाच्या मनाला चटका लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. जिल्हयाच्या राजकारणात माजी मंत्री रोहिदास पाटील यांना त्यांची खंबीर साथ होती ते माजी मंत्री पाटील यांच्यामागे मोठी शक्ती उभी करीत होते. त्यामुळे राजकारणातील मार्गदर्शक हरपल्याची भावना खा.डॉ.सुभाष भामरे यांनी व्यक्त केल्या.

डॉ.दिलीप पाटील-

उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात स्व.आण्णासाहेब डॉ.भाईदास पाटील यांची एक ऐतिहासिक कारकिर्द ठरली आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांचे ते आदर्श आणि डॉक्टरांचे ते डॉक्टर होते. निस्वार्थ मातृ-पितृ-बंधु प्रेमाचे स्व.डॉ.पाटील हे मुर्तीमंत उदाहरण होते. त्यांचा प्रत्येक दिवस हा रुग्णांच्या रुग्णसेवेसाठीच वाहीलेला असायचा.त्यामुळे त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रातील पितामह हरपल्याचे दुख डॉ.दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.

आ.अपूर्व हिरे, मालेगाव-
स्व.आण्णासाहेब डॉ.भाईदास पाटील यांनी संपूर्ण आयुष्य आरोग्य सेवेसाठी अर्पण केले होते. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात त्यांनी वैद्यकीय सेवे देण्याचे दैवी कार्य त्यांनी केले त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील देवताच आपल्याला सोडून गेला आहे.

राज्यभरातून शोकसंदेश-

स्व. अण्णासाहेब डॉ.भाईदास पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यभरातून वैद्यकीय, राजकीय, समाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध माध्यमातून शोकसंदेश कळविले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आ.वर्षा गायकवाड, आ.विश्‍वजित कदम, आ.विजय वडेट्टीवार, आ.अमित देशमुख, आ.सुधिर तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंदेश कळविले होते. स्व.आण्णासाहेब डॉ.भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर जवाहर मेडीकल फाऊंडेशनचे एसीपीएम मेडीकल कॉलेज मोराणे प्र.ल.धुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आ.मंजुळा गावीत, आ.अपूर्व हिरे, माजी मंत्री शालिनीताई बोरसे, बाजार समितीचे माजी सभापती सुभाष देवरे, ज्येष्ठ नेते किशोर पाटील, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, माजी जि.प.अध्यक्ष शिवाजी दहिते, प्रदेश काँग्रेसचे भा ई नगराळे, जि.प.सभापती संजिवनी सिसोदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे, राष्ट्रवादी काँग्रसचे माजी अध्यक्ष किरण शिंदे,जि.प.सदस्य किरण पाटील,डॉ.तुषार शेवाळे,ज्ञानेश्‍वर भामरे, सतिष महाले उपस्थित होते.

हेही वाचा:

The post खानदेशातील धन्वंतरी हरपला : स्व.डॉ.भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.