खा. हेमंत गोडसे : माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा; राऊत यांना खुले आव्हान

हेमंत गोडसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हेमंत गोडसे खासदारकीचा चेहरा आहे का, अशी खिल्ली उडविणार्‍या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना खासदार गोडसे यांनी माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा, असे खुले आव्हान दिले आहे. गोडसेंच्या या प्रत्युत्तराने शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष पुन्हा समोर आला आहे.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या खा. राऊत यांनी शिंदे गटात सामील झालेले खासदार गोडसे यांच्यावर टीका केली होती. त्यावर गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर देताना राऊत यांच्यामुळेच शिवसेनेचे वाटोळे होत असून, ठाकरे पिता-पुत्रांची दिशाभूल राऊत करीत असल्याचा आरोप केला. गोडसे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे. त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी गोडसेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि माझ्यात समन्वय आहे. कोणताही दुरावा नाही, असा दावा करत शिंदे गटातील अंतर्गत वादाचे आरोप फेटाळून लावले.

राऊत हेच शिवसेनेचे गद्दार : राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या सर्वच खासदारांचे दोन मुद्द्यांवर एकमत झाले की द्रौपदी मुर्मू यांची बिनविरोध निवड करावी आणि दुसरा मुद्दा म्हणजे खा. राऊत यांना बाजूला करावे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ते न केल्यामुळे त्याचे परिणाम आज दिसत असल्याचा दावा खासदार गोडसे यांनी केला. शिवसेनेच्या अनेक बैठकांमध्ये राऊत यांना फक्त सामनाचेच काम करू द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. परंतु, ऐकले नाही. महाविकास आघाडी स्थापन करून राऊत यांनीच शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोपही गोडसे यांनी केला.

राऊत म्हणजे भविष्य सांगणारा पोपट
माझा चेहरा खासदारकीचा नाही. मात्र, चेहरा नाही तर माणसाचे काम महत्त्वाचे असते. राऊतांनी कधी उद्योग व्यावसायिक आणि शेतकर्‍यांची बैठक घेतल्याचे ऐकीवात आहे का? त्यांना शेतीतले किती कळते, असा प्रश्न गोडसे यांनी केला. राऊतांच्या चेहर्‍यामुळेच शिवसेनेची आणि राजकारणाची प्रतिमा मलीन होत असून, राऊत जेलमध्ये होते. तोपर्यंत महाराष्ट्रात शांतता होती. परंतु, हा बोलणारा आणि भविष्य सांगणारा पोपट बाहेर आला आणि महाराष्ट्र पुन्हा अशांत झाल्याची टीका खासदार गोडसे यांनी केली.

हेही वाचा:

The post खा. हेमंत गोडसे : माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा; राऊत यांना खुले आव्हान appeared first on पुढारी.