गिरीश महाजनांवर आधारित ‘झेंडा २’ चित्रपट काढणार; अवधूत गुप्तेंची घोषणा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जामनेर शहरात प्रसिद्ध गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अवधूत गुप्ते यांनी गिरीश महाजन यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. महाजनांनी आपला आजपर्यंतचा राजकीय प्रवास उलगडला. गिरीश महाजन यांचा जीवनप्रवास ऐकून त्यांच्या राजकीय संषर्घावर आधारित ‘झेंडा-२’ चित्रपट करण्याची घोषणा अवधूत गुप्ते यांनी केली.

जामनेरात गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना अवधूत गुप्ते बोलत होते. कार्यकर्ते जेवढे हतबल असतात तितकाच नेता हतबल असतो हे दाखवणारा झेंडा-२ चित्रपट असू शकतो, असे अवधूत गुप्ते म्हणाले. जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन यांच्यासारखं नेतृत्व लाभले. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश महाजन असून, त्यांना या प्रवासात घरापासून पक्षापासून अनेक आव्हानांना तसेच विरोधाला सामोरे जावे लागले आहे. गिरीश महाजन यांच्या याच राजकीय संघर्षावर भविष्यात झेंडा चित्रपट करण्याची माझी इच्छा असल्याचे यावेळी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी जाहीर केले.

सायकलवर कुरमुऱ्याचं पोते घेऊन प्रचार करायचो

यावेळी गिरीश महाजन यांनी आपला राजकीय संघर्ष सांगितला. आमदारकीसाठी पहिलीच निवडणूक होती. त्यावेळी माझ्या खिशात पैसे सुद्धा नव्हते. मात्र माझे प्रतिस्पर्धी उमेदवार ईश्वर बाबूजी जैन हे लोकांना साखर वाटत होते. मात्र याही परिस्थितीत माझा विजय झाला व मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो. यानंतर सलग सहा वेळा मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आहे. पूर्वी मुरमुरे, कांद्याचे पोते घेऊन सायकलीवर निवडणुकांसाठी प्रचाराला जात होतो, मात्र आताचा काळ बदलला आहे. आता धाबे , हॉटेल लागतात. तसेच कार्यकर्त्यांनाही गाड्या एसी लागतात. पण माझे कार्यकर्ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे तसेच माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे आहेत.

हेही वाचलंत का?

The post गिरीश महाजनांवर आधारित 'झेंडा २' चित्रपट काढणार; अवधूत गुप्तेंची घोषणा appeared first on पुढारी.