ग्राहकांसाठी महावितरणच्या विविध सुविधा

महावितरण तक्रार

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो
लाइट बिल भरणे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी समस्या असते. इंटरनेटचा फारसा वापर करता येत नसल्याने एकतर ते रांगेत उभे राहून लाइट बिल भरतात किंवा बिल भरण्यासाठी मुलांवर अवलंबून राहावे लागते. बदलत्या काळानुसार महावितरण कंपनीने नागरिकांसाठी अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण अनेकांना त्या माहिती नसतात. त्यामुळेच आज या सुविधांची माहिती जाणून घेऊ या.

ग्रो ग्रीन : ग्रो ग्रीन म्हणजे घरी येणारे लाइट बिल पेपर स्वरूपात (हार्ड कॉपी) न घेता ई-बिलासाठी नाव नोंदवता येते. यामुळे बिलाच्या रकमेत १० रुपयांची सवलत मिळते. बिलाची रक्कम मोबाइल मेसेजमध्ये किंवा ई-मेलवर येते त्यावरून बिलाची रक्कम भरता येते. शिवाय ‘महावितरण’ ॲपमध्ये सर्व माहिती दिलेली असते.

* फसवणूक झालीच, तर ? : लाइट बिल भरताना चुकीच्या वेबसाइटवर बिल भरले गेले, तर लगेच १९३० नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवावी. त्यावर लगेच कारवाई करून रिफंड मिळवून दिला जातो.

* ते कसे ? : १९३० नंबरवर कॉल केल्यानंतर समोरून पोलिस कर्मचारी बोलतात. त्यांना व्यवहाराचा किमान तपशील द्यावा लागतो. त्यानंतर एक टोकन तयार केले जाते आणि व्यवहार थांबवण्यासाठी अलर्ट केले जाते. तक्रार संदर्भ क्रमांक म्हणजेच टोकन नंबर एसएमएस, लिंकद्वारे तक्रारकर्त्याला मिळतो. अलर्ट वाजल्यानंतर ट्रॅन्जेक्शन थांबवून रिपोर्ट दिला जातो. रक्कम गोठवून तात्पुरती होल्डवर ठेवली जाते किंवा ऑलाइन खर्च होइपर्यंत प्रक्रिया पुन्हा केली जाते. तक्रारीनंतर cybercrime.gov.in या वेबसाइटवर (website) तक्रार नोंदवावी. त्यानंतर पुढील २४ तासांत नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे आवश्यक असते. त्यानंतर बिलाची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी पोलिस कार्यवाही करतात.

* स्वत: रीडिंग पाठवण्याची सुविधा : कधी घराला कुलूप, तर कधी बिलाच्या रकमेत तफावत होऊ नये म्हणून महावितरणने त्यांच्या ‘महावितरण’ या ॲपमध्ये स्वत: रीडिंग देण्याचा पर्याय दिला आहे. प्रत्येक महिन्याच्या बिलिंग तारखेअगोदर मीटर रीडिंग सबमिट करण्याचा मेसेज येतो. त्यात तुम्हाला फक्त ॲप ओपन करून मीटरचा फोटो काढून सबमिट करायचा असतो.

* महावितरण ॲपमधून सोप्या पद्धतीने बिल भरता येते. बिल भरल्यानंतर लगेच मेसेज येतो आणि रिसिटही लगेच मिळते. सोबतच या अगोदरची बिलेही इथे बघता येतात.

* महावितरण ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येते. बिल येण्याआधी मीटरचे मागील रीडिंग व चालू रीडिंगमधील फरक बिलिंग युनिट नोंदवून बिल तपासता येते. रोखीने बिल न भरता डिजिटल पद्धतीने बिल भरले, तर बिलात ०.२५ टक्के (५०० रुपयांपर्यंत) सवलत मिळते.

* सौर ऊर्जा यंत्रणेवर ४० टक्के सवलत : केंद्र सरकारच्या नवीन योजनेद्वारे घरगुती वीजग्राहकांसाठी घराच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा यंत्रणेवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. www.mahadisccom.in या वेबसाइटवर (website) सर्व माहिती मिळेल.

The post ग्राहकांसाठी महावितरणच्या विविध सुविधा appeared first on पुढारी.