जळगाव : भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक; आमदार सत्यजीत तांबेंनी घेतली आंदोलकांची भेट

भारनियमन www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शेतीचा रब्बी हंगाम सुरू असताना भुसावळ तालुक्यात शेती परिसरात भारनियमन सुरु आहे. हे भारनियमन रद्द करण्यासाठी भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत व त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला तोंड द्यावे लागत असून तत्काळ भारनियमन रद्द करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत.

पिंप्रीसेकम संघर्ष समितीच्या वतीने आमदार सत्यजीत तांबे यांना एक निवेदन देखील देण्यात आले आहे.  पिंप्रीसेकम गाव पूरग्रस्ताच्या यादीत येत असून गावाला भविष्यात गावठाण विस्तारासाठी गट नं. २०५ हि मिळकत गावठाणाकडे वर्ग करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित करुनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. दीपनगर प्रशासन यांनी पिंप्रीसेकम गाव दत्तक गाव म्हणून जाहीर करावे व मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सोबतच गावातील विद्यार्थ्यांना स्कूलबसची व्यवस्था करावी. प्रकल्पग्रस्तांना त्वरीत रोजगार मिळावा. पिंप्रीसेकम येथील रहदारीच्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्हणून या वाहनांना येथून वाहतुकीसाठी बंदी घालावी. दीपनगर प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे शेतजमिनीचे नुकसान झाले असून, त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे मांडल्या आहेत.

मागण्यांसाठी पाठपुरावा करणार- आ. तांबे

यावेळी आमदार तांबे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच यासंदर्भात महानिर्मिती व महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर भारनियमन तत्काळ रद्द होण्यासाठी प्रयत्न करणार व आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.

The post जळगाव : भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक; आमदार सत्यजीत तांबेंनी घेतली आंदोलकांची भेट appeared first on पुढारी.