जळगाव : लाडक्या मुलीच्या बिदाईसोबत पित्याची अंत्ययात्रा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक येथे लग्न सोहळ्यातील आनंदावर विरजण पडले आहे. लग्नाची तयारी सुरू असताना मुलीवर अक्षता टाकण्यापूर्वीच हळदीच्या कार्यक्रमानंतर नाचत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अरुण कासम तडवी (५०, रा. मांडवे खुर्द, तोंडापूर, ता. जामनेर) असे मृत पित्याचे नाव आहे. ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यांच्या दुसऱ्या क्रमाकांची मुलगी हीना हिचा विवाह सोहळा सुरू होता. लग्नाची तयारी पूर्ण होत उत्साहात आनंदाने लग्नसोहळा पार पडत होता. हळदीच्या कार्यक्रमानंतर जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात बीदचा कार्यक्रम होतो. त्यानुसार हीना हिचाही बीदचा कार्यक्रम सुरू असताना नाचताना अरुण तडवी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने तोंडापूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली होती. ऐन लग्नमंडळपात वडिलांच्या मृत्यूची बातमी हीनापासून लपवून ठेवण्यात आली. सकाळी ७ च्या सुमारास तिचे लग्न विधिपूर्वक लागले. मात्र, वडील दिसत नसल्याने हीना कासावीस झाली. लग्नविधी आटोपल्यानंतर खरे काय ते कळल्यानंतर हीनाने हंबरडा फोडला. हीनाचा आक्रोश बघून लग्न सोहळ्याला उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. ज्या ठिकाणी मुलीचा विवाह सोहळा आटोपला, त्यानंतर काही तासातच त्याच ठिकाणी बापाची अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण नि:शब्द व सुन्न झाला. मृत अरुण तडवी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : लाडक्या मुलीच्या बिदाईसोबत पित्याची अंत्ययात्रा appeared first on पुढारी.