जळगाव : वैधमापन निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात; प्रमाणपत्रासाठी घेतली लाच

जळगाव पहूर (ता. जामनेर) : पुढारी वृत्तसेवा

येथील पेट्रोलपंपच्या नोझल मशिनच्या प्रमाणपत्रासाठी ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पाचोरा येथील वैधमापन शास्त्र विभागाच्या निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील एका पेट्रोलपंप धारकाला चार नोझल मशिनचे स्टँपींग करून प्रमाणपत्र हवे होते. या संदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैधमापन शास्त्र विभागाकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार  निरिक्षक विवेक सोनू झरेकर (५४) यांनी त्यांना प्रत्येक नोझलसाठी पंधराशे अशा एकूण ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जळगाव येथील कार्यालयाशी संपर्क साधला.

सापळा रचून केली कारवाई…

एसीबीच्या कार्यालयाने पथक तयार करून सापळा रचला. दरम्यान, बुधवारी (दि.23) विवेक सोनू झरेकर याने पहूर ते जळगावच्या दरम्यान असणाऱ्या हॉटेलवर सहा हजार रूपये स्वीकारताच पथकाने झरेकरला रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव व एन.एन.जाधव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा:

The post जळगाव : वैधमापन निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात; प्रमाणपत्रासाठी घेतली लाच appeared first on पुढारी.