जळगाव : शरद कोळींना भाषणास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सुषमा अंधारे

जळगाव; पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (उध्दव ठाकरे गट) महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्या सभा घेत आहेत. सभेत युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली. शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. या गदारोळानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. यामुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या जळगावात सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या सभांमधून ते गुलाबराव पाटील यांच्यावर प्रचंड निशाणा साधत आहेत. या सभांमध्ये युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी हे बंडखोरांवर खोचक टीका करत आहेत. शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे.

हॉटेलमध्ये धडकले पोलीस…

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस हे सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी भाषणास का बंदी घातली याचीदेखील कोळी यांना माहिती दिली.

दरम्यान, पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद कोळी यांना अटक करण्यासाठी पोलीस हॉटेलमध्ये आल्याचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आरोप केला आहे. या दरम्यान शिवसैनिक संतप्त झाल्याने पोलिसांसमवेत सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आणि ठाकरे गटाचे वक्ते पायी शहर पोलीस ठाण्याकडे निघाले.

हेही वाचा;

The post जळगाव : शरद कोळींना भाषणास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.