जिल्ह्यात ४४ पंप; मात्र बोटावर मोजण्याइतपत सुरू

सीएनजी पीएनजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबरच पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय उपलब्ध करून दिला. नागरिकांनीदेखील तो स्वीकारला. मात्र, जेमतेम पंप असल्याने तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने, पंपांची संख्या वाढविली जावी, अशी मागणी पुढे आली. आता पंपांची संख्या वाढली असली तरी, मागणीच्या तुलनेत पुरवठाच नसल्याने आता पंपधारकच गॅसवर असल्याची स्थिती आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात एकूण सीएनजी गॅसपंपांची संख्या ४४ च्या आसपास आहे. मात्र, यातील मोजकेच पंप सुरू असल्याने ‘गॅसवरचे वाहन सध्या तरी नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. सीएनजी वाहनांचे फायदे अधिक असले तरी, त्याची उपलब्धता फारच कमी असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुरू असलेल्या बहुतांश सीएनजी पंपांवर आजही वाहनांच्या रांगा लागत आहेत. याशिवाय सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यानेही अनेकांसाठी सीएनजी वाहने डोकेदुखी ठरत आहेत. सध्या नाशिकमध्ये सीएनजीचे दर डिझेलच्या दराइतकेच झाले आहेत. ९६ रुपये ५० पैसे किलोने सीएनजी मिळत आहे.

दरम्यान, सीएनजी गॅसपंपांची मागणी लक्षात घेता अनेकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक करीत पंप उभारले. नाशिक शहरात तब्बल १८ सीएनजी पंप असून, जिल्ह्यात २६ पेक्षा अधिक सीएनजी गॅसपंप आहेत. मात्र, यातील मोजकेच पंप सुरू असल्याने, पंपधारक हैराण आहेत. पंप बंद असण्यामागे सीएनजी गॅसचा मागणीच्या तुलनेत पुरवठा न होणे हे मुख्य कारण आहे. वाहन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वर्षभरापूर्वी सीएनजी वाहने घेण्याकडे अनेकांचा कल होता. मात्र, सीएनजी गॅसचा तुटवडा, पंपांच्या अपुऱ्या संख्येमुळे पुन्हा एकदा नागरिकांचा पेट्रोल, डिझेल वाहने खरेदीकडे कल वाढताना दिसत आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांचाही पर्याय समोर आल्याने सीएनजी वाहन खरेदीचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सीएनजी गॅसपंप उभारले असले तरी, मागणीच्या तुलनेत सीएनजी गॅसपुरवठाच होत नसल्याने हे पंप बंद अवस्थेत आहेत. परिणामी सीएनजी वाहने खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवताना दिसून येत आहेत. – भूषण भोसले, अध्यक्ष, पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशन.

हेही वाचा:

The post जिल्ह्यात ४४ पंप; मात्र बोटावर मोजण्याइतपत सुरू appeared first on पुढारी.