झारखंड सरकारच्या निषेधार्थ साक्रीत जैन सकल समाजाचा मोर्चा

साक्री आंदोलन,www.pudhari.news

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा

झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात जैन समाजाने आज भारत बंदची घोषणा केली. या भारत बंदला साक्री शहरातील सकल जैन समाजाने देखील आपला पाठिंबा दिला. आज साक्री शहरातील जैन बांधवांनी दुकाने व सर्व व्यवसाय बंद ठेवून झारखंड सरकारचा निषेध केला. पोळा चौक येथील जैन भवन पासून साक्री शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयापर्यत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देण्यात आले. या मूक मोर्चा मध्ये सकल जैन समाजातील जैन बांधव व महिला भगिनी, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यात जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण स्थित आहे. या तिर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्यास जैन समाजाचा विरोध आहे. पर्यटन स्थळे आणि वन्यजीव अभयारण्य या सारख्या गोष्टी करण्यासाठी सरकारने जारी केलेली अधीसुचना धार्मिक श्रद्धा दुखवणारी आहे. कोणताही सुसंस्कृत समाज अशा योजना स्वीकारणार नाही. झारखंड सरकारसह केंद्र सरकारने श्री सम्मेत शिखरजीसह देशातील सर्व धार्मिक स्थळे पवित्र स्थळे म्हणून घोषित करून तेथे दारु मांसाहार व इतर व्यसनावर बंदी घालावी पवित्र स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे चुकीचे असून श्री सम्मेत शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा साक्री शहरातील सकल जैन समाजाकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी अध्यक्ष राजेंद्र संचेती, अनिल कांकरिया, डॉ. दिलीप चोरडिया, राजेंद्र टाटिया, प्रकाश छाजेड, पीयूष कर्नावट, विजय पारख, गोटू टाटिया, प्रभाजी टाटिया, जोशीला पगरिया, सुरेखा कर्नावट, ज्योती टाटिया, मोक्षा टाटिया, प्रेक्षा कांकरिया सह साक्री शहरातील सकल जैन समाजातील बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेही वाचा :

The post झारखंड सरकारच्या निषेधार्थ साक्रीत जैन सकल समाजाचा मोर्चा appeared first on पुढारी.