“तोंडसुख झाले पुढे काय…”

संजय राऊत - शिवसेना कार्यालय www.pudhari.news

कॅलिडोस्कोप : ज्ञानेश्वर वाघ

ठाकरे गटाचे डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या केवळ चर्चेने नाशिकमध्ये मोठे राजकीय मोहोळ उठले. संभाव्य होणारे बंड थंड करण्यासाठी आणि जाणार्‍यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांना नाशिकचा दौरा करावा लागला. राऊतांकडे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी असल्याने त्यांना तसेही येणेच होते. या दौर्‍यातही त्यांनी नेहमीप्रमाणे भाजप आणि शिंदे गट या विरोधकांवर तोंडसुख घेतले. बंद दरवाजाआड नाराज असलेल्यांशी संवाद साधत नाशिकमधून कुणीही फुटणार नाही, असा आशावाद व्यक्त केला. मात्र अंतर्गत वाद आणि गटबाजी होणार नाही याबाबत त्यांच्याकडून ठोस निर्णय होणे अपेक्षित होते. तो न झाल्याने बंडखोरीची जी भीती भविष्यात ठाकरे गटाला आहे ती कायम राहणार आहे. यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत बंडखोरीची धाकधूक ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्षांना राहणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल, मे या दोन महिन्यांच्या कालावधीत पार पडू शकतात. त्यादृष्टीने शासनाकडूनही तयारी केली जात आहे. त्यापूर्वी महापालिका आणि जिल्हा परिषदांमधील प्रभाग आणि गटांची रचना आखून सदस्यीय संख्या ठरवावा लागणार आहे. कारण शासनाने मागील महिन्यात काढलेल्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश जारी केले असले तरी त्या आदेशातून सविस्तर असे मार्गदर्शन महापालिकांना करण्यात आलेले नाही. परिपत्रकातून दिलेल्या संदर्भाच्या आधारे अहवाल तयार करून तो सादर करावा लागेल आणि त्यावर समिती गठीत करून महापालिकांना आपली कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होईल. तत्पूर्वीच निवडणुकांचे संकेत मिळू लागल्याने पक्षांतरासाठी अनेकजण दंड थोपटून उभे आहेत. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या बाळासाहेबांची शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे गटाकडून आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून, विचारधारेचा विचार करता ठाकरे गटातून अनेकजणांना शिंदे गटाने आपल्या गळाला लावले आहे. नाशिकमधून पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यानंतर शिंदे गटाला फारसे हाती काही लागले नाही. यामुळेच ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला असून, तो कमी करण्यासाठी शिंदे गटाकडून जोर लावला जात आहे. त्या अनुषंगानेच ठाकरे गटातील एक मोठा गट फोडून आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असले तरी त्यासाठी खास प्रयत्न होताना दिसत नाही. कारण आजमितीस नाशिकपुरते बोलायचे झाल्यास शिंदे गटामध्येच आलबेल असलेले दिसत नाही. कारण पालकमंत्री भुसे, खासदार गोडसे आणि आमदार सुहास कांदे यांच्यासह त्यांच्या महानगरप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांमध्ये फारसा समन्वय असल्याचे दिसून येत नाही. त्यांच्यातही वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या उपरही डझनभर माजी नगरसेवक ठाकरे गटातून शिंदे गटात जायला तयार आहेत. मात्र भुसे, गोडसे आणि महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांना बायपास करून संबंधित लोक थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडूनच ठाकरे गटातील बातमी लीक झाल्याने त्याचा गाजावाजा झाला आणि मागील हप्त्यात होणारा प्रवेश सोहळा थांबला.

ऐन निवडणुकीच्या तोंंडावर डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटात जाणे हे ठाकरे गटालाही परवडणारे नसल्याने संजय राऊतांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नाशिकला धाव घेत पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांना उभारी देण्याचा व धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, राऊत यांनी आपल्या शैलीत नेहमीप्रमाणेच विरोधकांवर तोंड सुख घेत वाहवा मिळवली. मात्र पक्षातून कोणी फुटणार नाही याची शाश्वती दिली नाही. ठाकरे गटातून बाहेर पडलेल्यांना बंडखोर, गद्दार अशी विशेषणे संबोधून जाणार्‍यांनाही इशारा देऊ केला आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्ष मातोश्रीवरून चालतो तो कुणाच्या सांगण्यावरून चालत नसल्याचे स्पष्ट करत पक्षातील स्थानिक पदाधिकार्‍यांनाही समज देण्याचा प्रयत्न केला आहे. राऊतांच्या दौर्‍यानंतरही त्या डझनभर माजी नगरसेवकांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा थांबलेली नाही. त्यामुळे त्या चर्चेचे रूपांतर कृतीत होऊ नये म्हणजे झाले. राऊत यांनी विशेषत: यावेळी आपला मोर्चा खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे वळवत गोडसे हा खासदारकीसाठी काय चेहरा आहे का, अशी विनोदी संवादफेक केली. परंतु, तेच गोडसे शिवसेनेतून दोन वेळा खासदार झाले आणि तेही भुजबळ यांच्या विरोधात. यामुळे खरे तर गोडसे यांच्या नावे झालेला हा विक्रम आहे आणि आज त्याच गोडसेंनी संजय राऊत यांनाच निवडणुकीत समोरासमोर या असे खुले आव्हान दिले आहे.

अविश्वास दाखवून नका अन्यथा…
गेल्या काही दिवसांपासून डझनभर नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या वावड्या सुरू असल्याने त्यांना थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसून येत नाही. त्यामुळेच राऊतांना नाशिकमध्ये दोन दिवस तळ ठोकून राहावे लागले. तसेच राऊतांच्या सांगण्यावरून स्थानिक पदाधिकार्‍यांनी संबंधितांच्या घरी जाऊन तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधत तुम्ही खरच शिंदे गटात जाणार आहे का, अशी सातत्याने विचारणा केल्याने संबंधित नगरसेवकही कंटाळले आहेत. त्यामुळे सातत्याने अविश्वास दाखवून पक्षातून तुम्हीच आम्हाला बाहेर पडण्यास भाग पाडत आहात का असा जाब संबंधितांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा:

The post "तोंडसुख झाले पुढे काय..." appeared first on पुढारी.