दह्यामध्ये भेसळ केल्याने विक्रेत्यास 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा

न्यायालय

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा

दह्यात भेसळ केल्याप्रकरणी विक्रेत्यास न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंवासाची शिक्षा सुनावली आहे. पिंपळनेर शहरातील खेतेश्वर स्वीट मार्ट आणि रेस्टॉरंटचे मालक गुमानसिंह खुमानसिंग राजपुरोहित यांना दही या खाद्यपदार्थात भेसळ केल्याने न्यायमूर्ती कैलास अढायके यांनी सर्व पुराव्यांच्या आधारावर गुन्हा सिद्ध झाल्याने  सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा व हजार रुपये दंड व दंड न भरल्यास परत दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अन्न सुरक्षा प्रतिबंधक कायदा १९५४ च्या कलम ७ (१) नुसार व कलम १६ नुसार ही कारवाई करण्यात आली.

या खटल्याची थोडक्यात हकीगत अशी की, दि. १८ सप्टेंबर २०१० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी ज्ञानेश्वर सुभाष महाले हे पंच साक्षीदार व इतर सहकारी सोबत घेऊन साक्री शहरातील बस स्टँड शेजारी असलेल्या खेतेश्वर स्विट मार्ट व रेस्टॉरंट या दुकानात गेले. दुकानाची तपासणी केल्यानंतर शंका आल्याने दुकानातील खाद्यपदार्थांपैकी ६०० ग्रॅम दही सॅम्पल म्हणून घेतले व पंचासमक्ष सिल बंद केले. या दह्याचा नमुना तपासणीसाठी पाठविल्यानंतर विक्रेत्याने यात भेसळ केल्याचे लक्षात आले. त्यावरुन गुमानसिंह विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कामी सरकारी वकील डि. आर. जयकर यांनी आपली बाजू योग्य पद्धतीने न्यायालयात मांडून साक्षीदार तपासल्यानंतर विक्रेत्यास सहा महिन्याची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा :

The post दह्यामध्ये भेसळ केल्याने विक्रेत्यास 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा appeared first on पुढारी.