दै. ‘पुढारी’च्या आवाहनास उदंड प्रतिसाद ; वाचकांनी केली वृत्तपत्र विक्रेत्यांची संक्रांत गाेड

दै. पुढारी मकरसंक्रात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने दै. ‘पुढारी’तर्फे शहर-परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना तिळगूळ वाटप करीत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाला सहकार्य लाभलेल्या वॉव ग्रुपतर्फे (वूमेन ऑफ विज‌्डम‌) वृत्तपत्र विक्रेत्या महिलांना वाण देत गाैरविण्यात आले. या उपक्रमास वाचकांचाही उदंड प्रतिसाद लाभला. वाचकांनी यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांना तिळगूळ देत त्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

ऊन, वारा, पाऊस व कोरोनासारख्या महामारीची तमा न बाळगता भल्या पहाटे घरोघरी वृत्तपत्र पोहोचविण्याचे कार्य विक्रेते करतात. वाचकांना घरबसल्या वृत्तपत्रातून जगभरातील घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळते. वाचक चळवळीला बळ देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी दै. पुढारीने तिळगूळ वाटपाचा उपक्रम आयोजित केला. शहर-परिसरातील वृत्तपत्र वितरण डेपोवरती वृत्तपत्र विक्रेत्यांना तिळगुळाचे वाटप करत विक्रेत्यांचा मकरसंक्रांतीचा सण गोड करण्यात आला. आजच्या काळात घरातील कर्त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वृत्तपत्र विक्रेता क्षेत्रात महिलांनी त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मकरसंक्रांतीचे औचित्य साधत दै. पुढारी व वॉव ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्र विक्रेत्या महिलांना इको-फ्रेंडली बॅगचे वाण देत त्यांचा नावीन्यपूर्ण सन्मान केला.

याप्रसंगी वॉव ग्रुपच्या अश्विनी न्याहारकर, राजेश्वरी नायडू, सीमा बयनावार, पायल शहा, विशाखा धारणकर, गार्गी शेळके तसेच दै. ‘पुढारी’चे निवासी संपादक प्रताप जाधव, युनिट हेड प्रल्हाद इंदोलीकर, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण व्यवस्थापक अमर पाटील, सहायक वितरण व्यवस्थापक अशोक पाटील, वितरण विभागाचे जयवंत बडवर, इम्रान शेख, गणेश चव्हाण, आनंद त्रिभुवन, मंगेश दर्वे, संदीप शेवाळे, संदीप परसे, मनोहर अहिरे आदी उपस्थित होते. नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था नवीन नाशिकचे अध्यक्ष अजय बागूल, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे व सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर आदींचे या उपक्रमास सहकार्य लाभले.

वाचकांकडूनही कृतज्ञता

मकरसंक्रांतीच्या औचित्य साधत दै. ‘पुढारी’ने वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता आयोजित केलेल्या तिळगूळ वाटप उपक्रमात वाचकांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील वाचकांनी भरूभरून प्रतिसाद दिला. भल्या पहाटे आपल्या घरी वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांना वाचकांनी तिळगूळ देत त्यांच्याप्रती कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. वाचकांच्या प्रेमाने वृत्तपत्र विक्रेते गहिवरले.

वॉव ग्रुपच्या वतीने महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून प्रतिकूल परिस्थितीतही वृत्तपत्रांचे वितरण करणाऱ्या महिलांचा इको-फ्रेंडली बॅग देऊन सन्मान करताना आम्हाला विशेष अभिमान वाटला. यानिमित्ताने महिला वृत्तपत्र विक्रेत्यांना ऊर्जा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशान या उपक्रमात सहभागी झालो.
– अश्विनी न्याहारकर, वॉव ग्रुप

हेही वाचा : 

The post दै. 'पुढारी'च्या आवाहनास उदंड प्रतिसाद ; वाचकांनी केली वृत्तपत्र विक्रेत्यांची संक्रांत गाेड appeared first on पुढारी.