धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

धुळे तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर १२ जुलै २०१७ रोजी भगवान प्रताप मोरे या आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. पीडीत मुलीला लग्नाचे अमिश दाखवून पळवून नेले. यानंतर आरोपीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावात या पिडीतेला नेऊन तिच्यावर अत्याचार केले. यादरम्यान पीडीतेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर तपास अधिकारी यांना २० सप्टेंबर २०१७ रोजी पीडिता आणि आरोपी हे एका गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पिडीतेला आणि आरोपीला ताब्यात घेतले. या संदर्भात जबाब देताना संबंधीत पिडीतेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार आरोपी मोरे याच्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी दीपक ढोके यांनी या प्रकरणाचे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांच्यासमोर होते. यावेळी सरकारी वकील गणेश पाटील यांनी सरकार पक्षातर्फे महत्त्वाचे साक्षीदारांसह डॉक्टर मिलिंद पवार आणि अन्य महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयाच्या समोर आणले. या बरोबरच युक्तिवाद करीत असताना सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा आधार देत आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी मोरे यास दहा वर्ष मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. त्याचप्रमाणे भादवी कलम 363 अंतर्गत आणखी तीन वर्षाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा दिली आहे. या खटल्यात कामात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंग तंवर यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.