नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल

शेतकरी नामी शक्कल,www.pudhari.news

नाशिक (कवडदरा) : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील शेतकऱ्याने कांदापीक काढण्यासाठी नामी शक्कल लढवित मजुरी बचतीसाठी थेट ट्रॅक्टरलाच वखर लावून कांदा काढणी सुरू केली आहे. यामुळे आधीच अवकाळी, कवडीमोल अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादकांना खर्चात काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.

येथील शेतकरी सुनील सहाणे यांनी शिवारातील शेतीत कांदापिकाची लागवड केली आहे. त्यांचा मुलगा सुरंजन हा शेती अवजार वापरण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असतो. त्यानेच ही शक्कल लढवून मजुरीचे दर वाढल्याने व शेती न परवडणारी झाल्याने खर्च कमी करण्याचा उपाय शोधला आहे.

महागडी बी-बियाणे, खते, फवारणी अंतर्गत मशागतीची कामे यासाठी लागणारे भांडवल हे शेतकरी कर्ज काढून उभे करतो. पिकांचे उत्पादन येईल अशावेळी अवकाळीचा तडाखा पिकांना बसत आहे. पिकांचे नुकसान, भाव गडगडणे या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. त्यातच मजुरी वाढल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशात सहाणे यांनी लढविलेली शक्कल काहीशी दिलासा देणारी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून परिसरात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. अजूनही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे कांद्याला किमान 25 रुपये किलो भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल appeared first on पुढारी.