नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा

पोलिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ (पोलिस शिपाई) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मैदानी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (दि. २) घेण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत. 100 गुणांच्या या परीक्षेसाठी पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेनंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

नाशिक ग्रामीणच्या १६४ रिक्त शिपाई पदांसाठी दि. २ ते २० जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. मैदानी चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्यांना उमेदवारांमधून एकास 10 उमेदवार, या सूत्रानुसार लेखी परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 1800 उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. रविवारी (दि. २) सकाळी 10.30 ला परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षा केंद्रात उमेदवारांनी ओळखपत्र व प्रवेशपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीत पहिल्या २९ उमेदवारांनी ५० पैकी ५० गुण मिळविले आहेत. या सर्व उमेदवारांच्या आरक्षण तक्त्यात माजी सैनिक असा उल्लेख आहे. तर, सर्वसाधारण आणि माजी सैनिक या वर्गवारीतल्या उमेदवारांचा ‘कटऑफ’ ४३ गुणांचा आहे. गृहरक्षक दल वर्गवारीचा ४२, महिला ४०, प्रकल्पग्रस्त ३६, अनाथ ३०, खेळाडू २९, भूकंपग्रस्त २६ आणि पोलिस पाल्य २५ या गुणांचा ‘कटऑफ’ आहे.

शिपाई पदभरती

रिक्त जागा : १६४

प्राप्त अर्ज : १८ हजार ९३५

मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवार : ११ हजार २४४

लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार : १ हजार ८६१

हेही वाचा : 

The post नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा appeared first on पुढारी.