धुळे : चहातून गुगीचे औषध देऊन ६४ लाखांचे दागिने पळवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : गुंगीचे औषध देऊन कुरिअरच्या डिलिव्हरी बॉय कडून सुमारे 64 लाख 80 हजार रुपयांचे दागिने लांबवणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. या दोघांकडून चोरीस गेलेले 57 लाख 56 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याची उकल झाल्याबद्दल तपास पथकाला दहा हजाराचे रिवार्ड जाहीर केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी दिली.

या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, यांनी या गुन्ह्याची सविस्तर माहिती दिली .यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्यासह तपास पथक उपस्थित होते.

मुंबई येथील काळबादेवी परिसरातील विष्णुसिंह शिखरवार यांचे जय बजरंग कुरिअर सेवा आहे. या कुरिअर च्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातील सराफी काम करणाऱ्या दुकानांचे दागिने पोच करण्याचे काम केले जाते. याच अंतर्गत कुरिअरचा डिलिव्हरी बॉय गोविंद रघुनाथसिंह शिखरवार हा नाशिक येथून परिवहन महामंडळाच्या बस मध्ये 64 लाख 80 हजार 253 रुपये किमतीचे दागिने घेऊन निघाला. त्याच्या सीटवर चोरट्यांच्या टोळीतील एक तरुण बसला. या तरुणाने वाटेत बस थांबल्यानंतर चहा मधून शिखरवार यांना गुंगीचे औषध पाजले. त्यामुळे बस मध्ये शिखरवार यांना गाढ झोप लागली. दरम्यान वाटेत चोरट्याने बस थांबवून दागिन्याची पिशवी घेऊन पलायन केले. धुळे येथे आल्यानंतर आपण गंडवले गेल्याची बाब शिखरवार यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती दिली .त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे तसेच समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने सुरू केला. गुन्हा घडल्यानंतर तांत्रिक माहिती तसेच नाशिक येथील बस स्थानक आणि धुळे येथील बस स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले .या सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या तांत्रिक माहितीचा माग काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील ,उपनिरीक्षक प्रकाश पाटील तसेच विजय शिरसाट आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे यांचा तपास थेट उत्तर प्रदेश आणि राजस्थान पर्यंत जाऊन पोहोचला. पोलीस पथकाने या गुन्ह्यात आग्रा येथील मनोज कुमार राजेंद्र सिंह सिसोदिया, फिरोजाबाद येथील मयंग कुमार आनंदकुमार गुप्ता तसेच राजस्थान राज्यातील धोलपूर येथील पुष्पेन्द्र सिंह शिवसेना तोमर राजपूत आणि आग्रा येथील राहुल राजेंद्र सिंह सिसोदिया यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापैकी पुष्पेन्द्रसिंह तोमर याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून सुमारे 57 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमात जप्त करण्यात आला आहे. तपासात राहुल सिसोदिया याने कुरिअर बॉय शिखरवार याला चहामध्ये गुंगीकारक औषध पाजल्याने तो बस मध्ये झोपी गेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीने यापूर्वी मालेगाव येथे अशाच प्रकारचा गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्याची बाब देखील प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी या दागिन्यान संदर्भात जीएसटी चा प्रकार आहे किंवा कसे ही बाब देखील तपासून पहिली जात असल्याचे स्पष्ट केले आहे

The post धुळे : चहातून गुगीचे औषध देऊन ६४ लाखांचे दागिने पळवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या appeared first on पुढारी.