नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

बिबट्या

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील कानमंडाळे शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी भगवंत गोविंद चौधरी (४५) हा गंभीर जखमी झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत.

कानमंडाळे शिवारातील शेतात राहत असलेले भगवंत चौधरी हे सकाळी साडेआठच्या सुमारास विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस जवळच असलेल्या ओहोळातून आलेल्या बिबट्याने अचानक चौधरी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी जमिनीवर पडल्याने बिबट्याने त्यांच्या डाव्या हाताला, छातीला, डोळ्याच्या वर, गालाच्या खाली हनुवटीजवळ गंभीर जखमा केल्या. जवळच असलेले त्यांचे चुलतभाऊ सुकदेव सीताराम चौधरी व पुतण्या जितेंद्र राजाराम चौधरी यांनी जोराने आरडाओरड केल्याने बिबट्याने त्यांना सोडून ओहोळाच्या दिशेने धूम ठोकली. चौधरी यांना तातडीने नातलगांनी वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व तेथून औषधोपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. कानमंडाळे परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी  appeared first on पुढारी.