धुळे : ‘छायाकार्ट’ स्टार्टअपमुळे माेलाचे योगदान : हर्षल विभांडिक

छायाकार्ट www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला उद्योजक, बचतगट, कुटीर उद्योगासह हस्तकला उद्योगांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी धुळ्यात सुरू झालेली ‘छायाकार्ट’ स्टार्टअप मोलाचे योगदान पार पाडेल, असा विश्वास खानदेश उद्योग प्रबोधिनीचे हर्षल विभांडिक यांनी व्यक्त केला आहे.

खानदेश उद्योग प्रबोधिनीच्या कार्यालयामध्ये प्रख्यात सी. ए. श्रीराम देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘छायाकार्ट’ च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर नगरसेविका कल्याणी अंपळकर, छाया विभांडिक, कुसुम परदेशी यांच्यासह ‘छायाकार्ट’वर नोंदणी झालेले महिला उद्योजक उपस्थित होत्या. यावेळी अहिरराव व अंपळकर यांनी ‘छायाकार्ट’ संदर्भात सर्व माहिती जाणून घेत, भविष्यात ही स्टार्टअप राज्यासह देशभरातील ग्रामीण भागातील महिला उद्योजिका, बचतगट आणि हस्तकलेच्या वस्तूंसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देईल असा विश्वास व्यक्त केला. श्रीराम देशपांडे व हर्षल विभांडिक यांनी ‘छायाकार्ट’ला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ‘छायाकार्ट’ ही स्टार्टअप कावेरी परदेशी, इंजि. तुषार येवलेकर, अमोल सोनार, ग्यान शहाणे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. स्टार्टअपचे मुख्य कार्यालय हे धुळ्यात राहणार असून, सद्यस्थितीत ग्रामीण भागातील महिलांना ‘छायाकार्ट’च्या माध्यमातून सहभागी करून घेतले आहे. त्या पाठोपाठ येणाऱ्या काळामध्ये देशातील अन्य भागातील महिलांनाही या स्टार्टअपमध्ये जोडून घेतले जाणार असल्याचे तुषार येवलेकर यांनी सांगितले. सद्यस्थितीत ‘छायाकार्ट’वर महिलांसाठी वैविध्यपूर्ण हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या नऊवारी साड्या, लाकडापासून तयार करण्यात आलेली बैलगाडी, आइस्क्रिमसाठी आवश्यक असलेले विविध प्रीमिक्स, योगासन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुताच्या तसेच लोकरापासून तयार करण्यात आलेल्या सतरंज्या, पूजेसाठीच्या साहित्यासह विविध उत्पादने ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे कावेरी परदेशी यांनी सांगितले. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील एक हजारापेक्षा अधिक महिला उद्योजकांना, बचतगटांना यात सक्षमपणे हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘छायाकार्ट’ ग्रामीण भागातल्या उत्पादनांना विक्रीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म देत असताना, महिलांना पॅकेजिंग, मार्केटिंग, बँकिंग संदर्भातलं मार्गदर्शनदेखील करण्यात येणार आहे. जेणेकरून महिला देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील, सोबत त्यांचा स्वउन्नतीचा मार्गही प्रशस्त करू शकतील, असे अमोल सोनार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

The post धुळे : 'छायाकार्ट' स्टार्टअपमुळे माेलाचे योगदान : हर्षल विभांडिक appeared first on पुढारी.