धुळे : जेवताना झालेल्या वादातून महिलेला पेटवून ठार करणाऱ्या महीलेस जन्मठेप

विवाहितेला पेटवले

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जेवणावरून झालेल्या वादातून महिलेला पेटवून तिला ठार करणाऱ्या महिलेस जन्मठेपेची शिक्षा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर एच मोहम्मद यांनी सुनावली आहे. मयत महिलेचा मृत्यू पूर्व जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा दिली आहे.

शिंदखेडा शहरातील बस स्थानकाच्या मागे असलेल्या घरात हा प्रकार घडला. कमलाबाई यांच्या घरात आरोपी मुन्नीबाई सय्यद अलीम आणि वनिता ठाकरे या दोघी जेवण करत असतांना त्यांच्यात यावेळी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मुन्नीबाई हिने थेट बाटलीत रॉकेल आणून वनिता ठाकरे यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना सरळ पेटवूनच दिले. ही घटना सात ऑगस्ट 2018 रोजी राञी साडेदहाच्या सुमारास घडली. गंभीर भाजलेल्या अवस्थेत वनिता ठाकरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी वनिता ठाकरे यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जवाब त्यांना पेटवून दिल्याची माहिती दिली. त्यानुसार मुन्नीबाईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील चार साक्षीदार फितूर झाले होते. मात्र सरकारी अभियोक्ता मुरक्या यांनी मयताचा मृत्यूपूर्व जवाब आणि घटनेची गंभीरता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार न्यायालयाने मयताने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून आरोपी मुन्नीबाई हिला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी अभियुक्त मुरक्या यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा:

The post धुळे : जेवताना झालेल्या वादातून महिलेला पेटवून ठार करणाऱ्या महीलेस जन्मठेप appeared first on पुढारी.