धुळे : तब्बल तीन तास संभाषणातून अज्ञाताने ऑनलाइन पद्धतीने घातला नऊ लाखांचा गंडा

ऑनलाइन गंडा www.pudhari,news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याशी अज्ञाताने तब्बल तीन तास संवाद साधत सुमारे नऊ लाखाचा गंडा घातला आहे.  ओटीपी आणि तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर हा गंडा घालण्यात आला आहे. फसवणूक प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील शिरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील फार्मासिस्ट प्रभाकर हिम्मतराव पाटील हे परिवारासह धुळ्यात राहतात. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत अकाउंट असून त्यांना 93 872 84 988 या अनोळखी क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने हिंदी भाषेमध्ये मुंबई येथील बांद्रा शाखेतील स्टेट बँकेच्या शाखेतील जनरल मॅनेजर आकाश वर्मा बोलत असल्याचे सांगितले. तसेच क्रेडिट कार्डचा एनुअल चार्जेस रुपये 5829 रुपये रिफंड करून देण्याचे अमिष दाखवले. ही चर्चा होत असताना त्याने पाटील यांचे बँक खाते, पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड असे व्हाट्सअपवर मागून घेतले. त्यानंतर मोबाईलमध्ये कस्टमर सपोर्ट आणि एनी डेस्क तसेच सायलेंट हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी वरील ॲप डाऊनलोड करून त्याचा ओटीपी आणि इतर माहिती वर्मा यास दिले. दरम्यान दुसऱ्या दिवशी पाटील यांना पुन्हा त्याच क्रमांकावरून फोन आला. यानंतर त्याने रिफंड बाबत पुन्हा विचारपूस करून मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेल्या ॲप उघडून त्यावर आलेल्या ओटीपी मागितला. त्यादरम्यान तब्बल तीन तास पाटील यांच्या समवेत अज्ञात व्यक्ती तक्रारदारासोबत संभाषण करत होता. संभाषण थांबवल्यानंतर पाटील यांनी बँकेचे आलेले एसएमएस पाहिले असता त्यांना सहा ट्रांजेक्शन झाल्याचे दिसले. यात आठ लाख 99 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा सागर यांच्या मदतीने बँक खाते लॉक करून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गोराडे यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये असे आवाहन केले असून बँकेच्या माध्यमातून कोणी फोन केला असल्यास त्यांना आपले पासवर्ड किंवा ओटीपी देऊ नये असेही सांगितले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : तब्बल तीन तास संभाषणातून अज्ञाताने ऑनलाइन पद्धतीने घातला नऊ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.