धुळे : नासिक आणि गुजरात राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचे रॅकेट उद्ध्वस्त

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नासिक व गुजरात राज्यातील गावांमधून मोटार सायकलची चोरी करून साक्री तालुक्यात विक्री करणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकाला यश आले आहे. या चोरट्यांकडून वीस वाहने हस्तगत करण्यात आले आहेत. तपासात आणखी आरोपी आणि वाहनांची संख्या वाढणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या कारवाईत गुप्त माहिती देणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल राकेश बोरसे यांना दहा हजाराचा निधी पुरस्कार देत त्यांचा गौरव करण्यात आला.

पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्री विभागाचे उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी उपस्थित होते. कारवाईबाबत माहिती देताना बारकुंड यांनी नागरिकांना सूचित केले की, अल्प किमतीत दुचाकी किंवा अन्य कोणतीही वस्तू विकत घेऊ नये. अशा वस्तू विक्री करणाऱ्या संशयतांची माहिती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राकेश बोरसे यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली.

परिसरातील एक तरुण वेळोवेळी वेगवेगळ्या मोटारसायकली वापरत असून त्याच्या राहणीमानामध्ये बदल पडल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना दिली. त्यानंतर पारधी यांनी साक्री तालुक्यातील शेंदवड येथे राहणारा शामिल पांडू बागुल याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. सुरुवातीला बागुल येणे ताकास तूर लागू दिला नाही. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच मोटार सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले. बागुल याने बागलाण तालुक्यातील वीरगाव येथे राहणारा रोशन सुरेश गायकवाड यांच्या मदतीने 18 एप्रिल रोजी देश शिरवाडे येथून एका शेतकऱ्याच्या अंगणातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे बोपखेल गावातून देखील दोघांनी अशाचप्रकारे चोरी केली. साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघावे, नाशिक ग्रामीण भागातील छावणी, मालेगाव कॅम्प, वडनेर, सटाणा परिसरातून देखील दोघांनी दुचाकी चोरल्याची माहिती दिली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पारधी यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे तसेच लक्ष्मण गवळी, कांतीलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, अतुल पाटील, भास्कर सूर्यवंशी, राकेश बोरसे, प्रणय सोनवणे, पंकज माळी, विजयकुमार पाटील यांच्या पथकास आरोपींकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी विक्री केलेले वाहने संबंधितांच्या घरून हस्तगत करण्यात आले. तब्बल वीस मोटरसायकली या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान पोलीस कोठडीमध्ये दोघा आरोपींची आणखी कसून चौकशी केली जाणार असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकीच्या संख्येत आणखी वाढ होण्याची संभाव्य शक्यता असून आरोपी देखील वाढण्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान केवळ माहितीच्या आधारावर मोटरसायकल चोरीचे रॅकेट उघड झाले आहे. तसेच या कारवाईतील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा:

The post धुळे : नासिक आणि गुजरात राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचे रॅकेट उद्ध्वस्त appeared first on पुढारी.