धुळे : भविष्यात शिंदे गटाचे १०० आमदार असतील : मंत्री उदय सामंत

पिंपळनेर ; पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायती आणि इतर निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासोबत असल्याचे दिसत असतानाच काहीजण आम्हाला गद्दार म्हणून हिणवतात. त्यांनी आजची गर्दी पाहावी; मग कळेल गद्दार कोण आहेत? जनता आमच्या सोबत असल्याने आम्ही टीकेला घाबरत नाही. भविष्यात १०० आमदार आपलेच असतील,  असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.  पिंपळनेर (ता. साक्री) दौऱ्यावर त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले.

या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री उदय सामंत म्हणाले की,आ. मंजुळा गावितांनी देखील विकासासाठी धाडसी निर्णय घेत एकनाथ शिंदेना पाठींबा दर्शविला. पुरुष आमदारांवर होणारी टीका आम्ही समजू शकतो. मात्र महिलांवर देखील खालच्या स्तरावर टीका झाली. जनता त्यांचा बदला घेईलच, असे यावेळी सांगितले.

 सहा महिन्यात पिंपळनेरला एमआयडीसी उभी राहणारच

पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांनी माझ्याकडे औद्योगिक वसाहतींची मागणी केली आहे. मी शब्द देतो, येत्या सहा महिन्यात पिंपळनेरला एमआयडीसी उभी राहणारच. साक्रीच्या आमदार, तुमच्या विकासासाठी झटत आहेत. चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदार संघाने त्यांच्या मागे आपली शक्ती उभी करावी, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.

मंत्री सामंत यांचे साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित यांनी स्वागत केले. यावेळी खुल्या वाहनातून त्यांची पिंपळनेर-सटाणा महामार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य, सूतगिरणी संचालक, वि.का.सोसायटी संचालक आदी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

हेही वाचा

The post धुळे : भविष्यात शिंदे गटाचे १०० आमदार असतील : मंत्री उदय सामंत appeared first on पुढारी.