धुळे : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला बेड्या 

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांना गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाच्या मुसक्या देवपूर पोलिसांच्या पथकाने आवळल्या आहे. हा भोंदू बाबा जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील देवपूर भागातील नेहरू हाऊसिंग सोसायटीत राहणार्‍या सौ.किरण शेखर जडे यांच्याकडे अनोळखी भोंदू बाबा साधूच्या रुपात भिक्षा मागण्यासाठी व भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आला. जडे यांनी भविष्य बघण्यासाठी त्याला घरात बोलवले. तेव्हा त्याने महिलेसह तिच्या पतीला तुमचे सगळे चांगले करतो, असे सांगून हात चलाकी करून हातात कुंकू व तांदूळ घेऊन त्याची विभूती राख करून दाखविली. त्यानंतर मंत्र उच्चार करून महादेवाची छोटी पिंड प्रकट करून दाखवली. तुमच्याकडून मला काहीच नको, मी सोन्याची पूजा करून मंत्र मारून तुमचे परीक्षा घ्यायला आलो आहे, अशी बतावणी या भोंदू बाबांनी केली.

तुमच्या सोन्याची पूजा करून मंत्र मारून परत देतो व तुम्ही ते सोनं परिधान केल्यानंतर तुमचे सगळे कल्याण होईल व सुखी राहाल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर जडे यांनी भोंदू बाबाच्या सांगण्याप्रमाणे त्याच्याकडे सोन्याचे तीन ग्राम वजनाचे कानातील टाप्स व सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा एकूण १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने दिले. पण हे दागिने घेऊन भोंदू बाबा फरार झाला. याप्रकरणी  जडे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही वरून भोंदू बाबाचे फोटो मिळवून, त्याची माहिती काढली. तसेच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला देवपुरातील एकता नगरातून ताब्यात घेतले. भोंदू बाबाने त्याचे नाव नारायण किसन चव्हाण ( वय ३५ रा.ओझर खुर्द, ता. जामनेर, जि. जळगाव) असे सांगितले. चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हातील १८ हजारांचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

The post धुळे : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला बेड्या  appeared first on पुढारी.