धुळे : महाराष्ट्रातील गड आणि किल्ले हेच आपली जेजुरी आणि पंढरी : अभिनेता देवदत्त नागे 

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रातील गड आणि किल्ले हे माझ्यासाठी पंढरी आणि जेजुरी आहे. मी आतापर्यंत माझ्या उत्पन्नातील एक विशिष्ट भाग महाराष्ट्रातील गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी देतो, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेता देवदत्त नागे यांनी केले. खेळाडूंनी जय पराजयाचा विचार न करता पुढच्या स्पर्धेत नव्या जोमाने यश मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घ्यावा, असा सल्ला त्यांनी कुस्ती प्रेमींना दिला.

धुळ्यात गरुड मैदानावर राज्यस्तरीय पैलवान स्व. खाशाबा जाधव स्मृती चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, क्रीडा विभागाच्या नाशिक विभागीय उपसंचालक सुनंदा पाटील, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, प्रमुख स्पर्धा निरिक्षक संदिप भोंडवे, तांत्रिक समिती प्रमुख दिनेश गुंड, कुस्तीगीर परिषदेचे सदस्य उमेश चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, सुनील चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात या स्पर्धा होतील. या तीन प्रकारच्या स्पर्धा दहा वजनी गटात होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३० संघ आणि ६५0 पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी तीन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले असून 10 हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास मार्गदर्शन करताना अभिनेता देवदत्त नागे यांनी त्यांचे अनुभव कुस्ती प्रेमींना सांगितले. माझ्या व्यायामाची सुरुवात रायगड जिल्ह्यातील पेण येथील हनुमान व्यायाम शाळेपासून झाली. या ठिकाणी भगवान मारुती समोर आपण पहिला शड्डू ठोकला. या व्यायामशाळेच्या माध्यमातून व्यायाम सुरू केलेले प्लेट आजही मी देव्हाऱ्यात ठेवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामात सक्रियपणे काम करतो आहे. उत्पन्नातील एक विशिष्ट भाग यासाठी नियमितपणे आपण देतो. या बरोबरच पोलीस प्रशासनाच्या बरोबर 31 डिसेंबरला आपण ड्रंक अँड ड्राईव्ह या उपक्रमासाठी सहभाग नोंदवतो. राज्यातील पोलीस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण सर्व नागरिक झोपलेलो असतो. तर राज्यातील वीस हजार पोलीस जागे असतात. त्यांच्या अमूल्य योगदानामुळेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था असल्याचे मत नागे यांनी व्यक्त केले. कोणत्याही स्पर्धेत जिंकणे किवा पराजय होणे, हे परमेश्वराच्या हाती असते. मात्र खेळाडू वृत्तीने खेळले पाहिजे. मी देखील अनेक वेळेस हरलो. पण पुढच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी पुन्हा नव्या हिंमतीने उभा राहिलो. अशाच पद्धतीने कुस्ती वीरांनी देखील खिळाडू वृत्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. अशा प्रकारच्या कुस्ती स्पर्धेतून ऑलिंपिकचे पदक भारताला भविष्यात नक्कीच मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

तसेच तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी विजय चौधरी यांनी देखील कुस्ती स्पर्धेला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कोणत्याही क्रीडा स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य आणि खेळाडू वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे प्रत्येकाने आवडत असलेल्या खेळांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी स्पर्धेला शुभेच्छा देत राज्यात कोल्हापूरच्या पाठोपाठ धुळे ही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. आगामी काळात धुळ्यामधून ऑलम्पिकचे पदक आणणारा खेळाडू निर्माण होऊ शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:

The post धुळे : महाराष्ट्रातील गड आणि किल्ले हेच आपली जेजुरी आणि पंढरी : अभिनेता देवदत्त नागे  appeared first on पुढारी.