नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच

फ्राॅड www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सटाणा तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांच्या नावाखाली गैरव्यवहारांची मालिकाच सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ताहाराबाद, भाक्षी आणि त्यानंतर आता अंतापूर ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अंतापूर येथील ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. हा गैरव्यवहार झाल्याचे पुरावे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे दिले आहेत.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने अनेक बांधकामे निकृष्ट केली आहेत. कामांमध्ये अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. विकासकामांच्या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रस्त्यांचे झालेले काँक्रिटीकरण, भूमिगत गटार, स्मशानभूमी, ग्रामपंचायत सेसमधून केलेला खर्च, पाण्याच्या टाकीखालील काँक्रिटीकरण, व्यायामशाळा, जि. प. प्राथमिक शाळा, अंगणवाडी बांधकाम, तलाठी कार्यालय दुरुस्ती, कचराकुंड्या व कचरा विल्हेवाट, शौचालय लाभार्थी यादी, महिला शौचालय बांधकाम व शौचालय साहित्य खर्च यांची खोटी बिले दर्शवून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील बांधकामांसाठी ई-टेंडरिंग झाले असता, फक्त एकाच ठेकेदारास सर्व बांधकामांचे टेंडर दिले असून, ही बाबही संशयास्पद असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. तक्रार अर्जावर अनिकेत सोनवणे, मुकेश पवार, विलास गवळी, चंद्रकांत गवळी, गोविंद मानकर, श्रीकांत पवार, दिगंबर खैरनार, ईश्वर मानकर, युवराज जाधव आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. विशेष म्हणजे सर्व कामांच्या निविदा झालेल्या असताना एकाच ठेकेदाराला कामे दिल्याचेही पुराव्यावरून दिसून येत असल्याने या कामाच्या चौकशीचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधित शिष्टमंडळाला दिले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच appeared first on पुढारी.