धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक

धुळे, पुढारी वृत्तसेवा : बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत नवीन विहिरीच्या काम पूर्ण करून झालेल्या कामाचे अनुदानाच्या मोबदल्यात आठ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकल्यामुळे धुळे जिल्ह्यात लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

शिरपूर तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या तक्रारदाराच्या आईच्या नावे मौजे वाकपाडा येथे शेत जमिनीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत राबवल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा कृषी योजने अंतर्गत नवीन विहीरीसाठी अर्ज करण्यात आला होता. त्याप्रमाणे विहीर मंजूर झाली. या विहिरीचे खोदकाम व बांधकाम चालू केल्यानंतर वेळोवेळी झालेल्या कामाची पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून पाहणी करण्यात येऊन पहिल्या हप्त्याची रक्कम तक्रारदार यांना मिळाली. त्यानंतर विहिरीचे उर्वरित राहिलेले काम पूर्ण करावे तसेच या कामाचे अनुदान बिला संदर्भात विचारपूस करण्याकरता तक्रारदार शिरपूर पंचायत समितीच्या कृषी विभागात गेले.

यावेळी त्यांची भेट ज्ञानेश्वर भगवान पाटील यांच्याशी झाली. यावेळी पाटील यांनी दुसऱ्या हप्ताचे काम मंजूर केले असून एक लाख एकतीस हजार रुपये खात्यावर जमा झाले आहे. त्याच्या मोबदल्या दहा हजार रुपये द्यावे लागतील, पैसे काढल्यानंतर तू मला भेट ,असा निरोप तक्रारदाराला पाटील यांनी दिला. लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार यांनी धुळ्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी संपर्क केला. या संदर्भातील तक्रारीची आज पडताळणी करण्यात आली. यावेळी तडजोडी अंती ८,००० रुपयाची मागणी पाटील यांनी पंचांच्या समोर केली. तसेच ही रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार उपअधीक्षक पाटील तसेच पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे यांच्यासह राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, सुधीर मोरे आदी पथकाने शिरपूर शहरातील हॉटेल ग्यानभाई चहा व नाश्ता सेंटर येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचंलत का?

The post धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक appeared first on पुढारी.