धुळ्यातील राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. या पक्षाच्या ओबीसी आघाडीचे सरचिटणीस, धुळे शहर विधानसभा क्षेत्राध्यक्ष आणि शहर जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यात या गटबाजीवर टीका केली आहे. आपण पक्षाची ध्येय धोरणे राबवत असताना या दोन्ही गटांकडून त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन वर्षांपासून गटबाजी सुरू झाली आहे. या गटबाजीचा परिणाम आता पक्ष संघटनेवर होत असल्याचे या तीनही राजीनाम्या मधून दिसून आले आहे. धुळे शहरात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दौरा आयोजित करण्यात आला. धुळे शहरात असणारे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालयाचे नूतनीकरण माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांकडून वर्गणी करून केले. या कार्यालयाचे रूपडे पालटल्यानंतर कार्यालयाचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमात पक्षात असलेल्या गटबाजीमुळे होत असलेल्या त्रास हा दस्तूरखुद्द अनिल गोटे यांनी नेते शरद पवार यांच्या समोर कार्यक्रमातच मांडला. कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या कामाकडे एका गटाने ढुंकून देखील पाहिले नाही. तसेच पक्ष कार्याला मदत देखील केली नसल्याचा खळबळजनक आरोप खा. पवार यांच्यासमोर झाला. विशेषता खासदार शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण कधीच राष्ट्रवादीच्या संघटन कामात पाहिले नसल्याची टीका आमदार अनिल गोटे यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या समोर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन शक्तीवर यामुळे परिणाम होत असल्याची भीती काही वक्त्यांच्या भाषणांमधून व्यक्त झाली. या गटबाजीवर राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार हे उपयोजना करतील अशी अपेक्षा असतानाच खा पवार यांनी माजी आमदार अनिल गोटे यांनी मल्हार बागेत आयोजित केलेल्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवून दुसऱ्या गटातील पदाधिकारी रणजीत भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली. याचा पक्ष संघटनेवर मोठा परिणाम होणार असल्याचे चिन्ह दिसत असतानाच आता ओबीसी सेलच्या तिघाही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गिरीश भामरे, धुळे शहर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कुंदन पवार तसेच धुळे शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माळी यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच कार्यकारिणी देखील बरखास्त केल्याचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुदे यांना पाठवलेल्या पत्रात कळवले आहे. या राजीनामा पत्रामध्ये दोनही गटांवर आरोप करण्यात आले आहे. विशेषतः जिल्ह्यात पक्षाचे नेते खासदार शरद पवार हे आले असताना ओबीसी आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले गेले नाही. त्याचप्रमाणे आघाडीचे काम सुरू असताना देखील दोन्ही गटाकडून संशयाने पाहिले जात असल्याने या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. या राजीनामा प्रकाराचा परिणाम पक्ष संघटनेवर होणार असल्याने आता पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे धुळेकरांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

The post धुळ्यातील राष्ट्रवादीच्या ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा appeared first on पुढारी.