नंदुरबारमध्ये ३२ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त; उपनगर पोलिसांची कारवाई

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, सुगंधीत तंबाखुची होणारी अवैध चोरी, विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी याबाबतची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

रविवारी (दि. 23) सायंकाळी गुजरात राज्यातून नंदुरबार मार्गे मालवाहतूक वाहनातून सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी (दि 23) धानोरा ते नंदुरबार रस्त्यावर सुंददे बस स्थानकाजवळ सापळा रचला. धानोरा (ता. नंदुरबार) गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना धानोरा गावाकडून नंदुरबार शहराच्या दिशेने भरधाव येणारे मालवाहू वाहन (क्रमांक MH 39 AD 1877) दिसून आले. पोलीस पथकातील अमंलदारांनी वाहन थांबविले. वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता सचिन भगवान पाटील (वय 45 वर्ष, रा. शुभम पार्क, नंदुरबार) आणि रत्नदिप वासुदेव पाटील ऊर्फ राकेश किशोर राजपुत (वय 32 वर्ष, रा. शिवाजी रोड, जळका बाजार, नंदुरबार) असे सांगितले. उपनगर पोलीस ठाण्याच्या पथककांनी त्यास वाहनात काय भरले आहे? याबाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला, म्हणून उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी दोन्ही संशयीत व चारचाकी वाहन ताब्यात घेतले.

उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकांनी कायदेशीर प्रक्रिया करून वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्या दिसून आल्या. सदर गोण्या उघडून पाहिले असता त्यात महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखू मिळुन आली. आरोपीस सदरची सुगंधीत तंबाखू बाबत विचारपुस केली असता त्याने निझर ता. निझर जि. तापी गुजरात राज्य येथून विकत घेवुन ते विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून जात असल्याचे सांगितले. दोन्ही संशयीत आरोपीत व एकुण 32 लाख 63 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाणे येथे 111/2023 भा.द.वि. कलम 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (i)- 27 (3) (c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची सुगंधीत तंबाखू ही कोणाकडून विकत आणली तसेच कोणास विकण्यास जात आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून दोषविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

The post नंदुरबारमध्ये ३२ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त; उपनगर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.