नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले

नंदुरबार www.pudhari.news

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा

गुजरात राज्यातील चक्रीवादळ हे घरांसह शेत पिकांची प्रचंड नासधूस करीत नंदुरबार जिल्ह्यात येऊन धडकले. त्यामुळे नंदुरबार तळोदा अक्कलकुवा शहादा या तालुक्यांमध्ये विद्युत खांब आणि अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, या वादळी पावसात तळोदा तालुक्यात 30 हून अधिक शेळ्या मरण पावल्या. तर, विद्युत तारांचे घर्षण होऊन झाडांनी पेट घेतल्याची घटना नंदुरबार शहरात घडली.

रविवार (दि.4) रोजी सकाळी १० वाजता अचानक वादळी वाऱ्याने रौद्र रुप धारण केले. त्यात तळोदा तालुक्यातील तळोदा-चिनोदा रस्त्यावर वडाचे झाड गाडीवर कोसळून एकचा जागीच मृत्यू झाला. प्रतातपूर ता. तळोदा येथील राजेंद्र रोहिदास मराठे (४२ ) असे मृत इसमाचे नाव आहे. आर्टीगा (जी.जे. -06 जी. ई-0541) या त्यांच्या स्वतःच्या वाहनाने ते जात असताना त्यांच्या वाहनावर अचानक झाड कोसळल्याने गाडीचा वरचा पत्रा फाटून अपघात घडला. यामध्ये राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच रविवार (दि.4) 11 ते 12 दरम्यान नंदुरबार जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात चक्रीवादळाचा फटका बसला. अशातच विजांचा प्रचंड कडकडाट होत मुसळधार तर कुठे बारीक सरी कोसळल्या. शहादा तालुक्यातील अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाले, कौलारू छत कोसळल्याच्या घटना घडल्या. अक्कलकुवा खापर रस्त्यावर लहान मोठे वृक्ष कोसळले. तळोदा तालुक्यात देखील झोपड्या उडून जाणे पत्रे उडून जाणे अशा घटना घडल्या. नंदुरबार तालुक्यातही नुकसान झाले असून एका कापूस गोदामाचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे.

The post नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले appeared first on पुढारी.