नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी

हाणामारी

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अन्य पाच जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शहादा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे गावठी पिस्तूल व तलवारी कोठून आल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मध्यप्रदेश सीमेलगतच्या गावांमधून नंदुरबार जिल्ह्यातील इतर भागात अवैध शस्त्र छुप्या रीतीने आणले जातात या चर्चेला यामुळे उधान आले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलगाव (ता. शहादा) शिवारातील पिपल्यापाडा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात हाणामारी झाली. मलगाव हे मध्य प्रदेश सीमेलगतचे शहादा तालुक्यातील गाव आहे. या गावातील पिपल्यापाडातील खर्डे आणि पावरा कुटुंबात शेतीवरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. संबंधित शेतीची जमीन आणि सरकारी जमीन यावरील हक्कावरून हा वाद धुमसत आहे.

भाऊबंदकीतील हा वाद आज विकोपाला जाऊन थेट हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी काठ्या, विळे, तलवारसह गावठी पिस्तूलचा वापर करीत यावेळी दोन राउड फायर करण्यात आले. या गोळीबारात अविनाश सुकराम खर्डे (वय २६, रा. मलगाव ) हा जागीच ठार झाला.तर त्याचे काका रायसिंग कलजी खर्डे (वय ५४) यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर सुकराम कलजी खर्डे (वय४२), गणेश दिवाण खर्डे (वय २४), रामीबाई दिवाण खर्डे (सर्व रा. मलगाव ) सुनील राजेंद्र पावरा (वय २३), अरुण राजेंद्र पावरा दोघे रा. बेडीया (ता. पानसेमल,मध्यप्रदेश) हे पाच जण गंभीर जखमी झाले. यात मयत अविनाश खर्डे यांचे वडील सुकराम कलजी खर्डे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या ताफा घटनास्थळी दाखल झाला. अप्पर पोलीस निरीक्षक निलेश तांबे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यात देवेसिंग रायसिंग खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुनील राजेंद्र पावरा, गणेश दिवाण खर्डे, सोनीबाई गणेश खर्डे, अरुण राजेंद्र पावरा, ललिताबाई राजेंद्र पावरा, रमीबाई दिवाण खर्डे यांनी फिर्यादी देवेसिंग खर्डे यांच्या शेतात घुसून तलवार, विळा व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. सुनील पावरा याने गावठी कट्ट्याने फिर्यादीचा भाऊ अविनाश याचा छातीवर गोळी मारुन जागीच ठार केले. व काका सुकराम खर्डे यांच्यावरही गोळी झाडून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून सहा जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूने सोनीबाई गणेश खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुकराम कलजी खर्डे,अविनाश सुकराम खर्डे, रायसिंग कलजी खर्डे, ममता सुकराम खर्डे, शकुंतला रायसिंग खर्डे, देविदास रायसिंग खर्डे, निलेश रायसिंग खर्डे, जगदीश रायसिंग खर्डे (सर्व रा. मलगाव) या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सपोनि नितीन पाटील करीत आहेत.

 हेही वाचा : 

 

The post नंदुरबार : मलगावात जमिनीच्या वादातून गोळीबार; काका-पुतण्या ठार, पाच जखमी appeared first on पुढारी.